
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाची सज्जता वाढवण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्या’निमित्त विशेष ‘आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा’ संपन्न झाली.
स्थैर्य, सातारा, दि. २७ : सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा प्रामुख्याने अतिवृष्टीप्रवण क्षेत्रात येत असल्याने, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाची सज्जता वाढवण्यासाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पधंरवडा – २०२६’ अंतर्गत कोयना सिंचन विभाग (कोयनानगर) व लघु पाटबंधारे विभाग (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ही ‘आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा’ उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके
या कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शकांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले:
-
विवेक नायडू व लखन गायकवाड (मास्टर ट्रेनर, यशदा पुणे) : यांनी आपत्ती काळातील तांत्रिक बाबी आणि अचूक नियोजनावर प्रकाश टाकला.
-
देविदास ताम्हाणे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, सातारा) : यांनी आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पातळीवरील समन्वयाचे महत्त्व समजावून सांगितले.
-
सुनील पारधे (लीडिंग फायरमन, सातारा) : यांनी आग आणि बचावात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेत केवळ ‘थिअरी’वर भर न देता अग्निशमन व आपत्कालीन बचावकार्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके (Demos) सादर करण्यात आली. पूरस्थिती, अतिवृष्टी आणि आगीच्या घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा, याचे कौशल्य कर्मचाऱ्यांनी यावेळी आत्मसात केले.
‘जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी समन्वय आवश्यक’
“सातारा जिल्ह्यात दरवर्षी होणारी अतिवृष्टी पाहता, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. ही कार्यशाळा अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्तीच्या काळात जलद आणि अचूक निर्णय घेण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.”
– अभय काटकर (अधीक्षक अभियंता)
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी कार्यकारी अभियंता महेश रासनकर, वरुण मोटे, योगेश शिंदे, अमर काशीद तसेच उपअभियंता अक्षय पाटील, जयवंत बर्गे आणि सातारा सिंचन मंडळ व सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधिपत्याखालील सर्व उपविभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

