
आठवीच्या एनसीईआरटी (NCERT) अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याच्या प्रकारावर साताऱ्याच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवरायांचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
स्थैर्य, सातारा, दि. २७ : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (NCERT) आठवीच्या अभ्यासक्रमातून ‘मराठा साम्राज्या’चा नकाशा वगळण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, ही अतिशय धोक्याची घंटा आहे. अशा घटनांतून बघता बघता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर पडदा पडू शकतो आणि सध्या तोच प्रयत्न चालू असल्याचे दिसते. मात्र, हा प्रकार आपण अजिबात खपवून घेणार नाही, अशी सक्त तंबी साताऱ्याच्या राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी दिली आहे.
साताऱ्यातील ‘जलमंदिर’ निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी या अत्यंत संवेदनशील विषयावर परखड शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
‘प्रसारमाध्यमांनी आवाज उठवावा’
या गंभीर विषयावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला पाहिजे आणि हा प्रश्न उचलून धरला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सगळ्यांच्या नसानसांत, अंगाअंगात आणि हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले असून, त्याला कोणीही हात लावू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवरायांच्या कठोर न्यायाची आज गरज
सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कोणी मांडताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत राजमाता म्हणाल्या की, शिवरायांनी अन्याय व अत्याचार करणाऱ्यांना ज्या कठोर पद्धतीने शिक्षा दिल्या, तशा प्रकारच्या शिक्षा जर आज दिल्या गेल्या, तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
‘जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत शिवरायांचे नाव राहील’
“आपण हिंदू आहोत, ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच! आपण शिवरायांचे मोल कधीच करू शकत नाही. ‘छत्रपती’ ही उपाधी त्यांनी लोकांसाठी व समाजासाठी जोपासली. शिवराय हे एक युगपुरुष होते. आज त्यांच्यावर संपूर्ण जगभरात संशोधन सुरू आहे. आपल्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड यश कमावले. त्यामुळे जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तेवतच राहील.”
– राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले
