भिलकटी: डॉ. आंबेडकरांनी उपेक्षितांना व स्त्रियांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले – प्रा. डॉ. प्रभाकर पवार


जय भीम तरुण मंडळ, भिलकटी येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या स्त्री मुक्ती आणि सामाजिक समतेच्या कार्याचा गौरव केला.

स्थैर्य, फलटण, दि. १६ मे : समतेचा आग्रह धरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध कायदे, हक्क व अधिकारांद्वारे दलित, पीडित, वंचित, उपेक्षित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या समूहांसह तमाम स्त्रीवर्गाला भारतीय विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी या उपेक्षित घटकांना एक नवा चेहरा प्राप्त करून दिला, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

भिलकटी (ता. फलटण) येथे ‘जय भीम तरुण मंडळ’ यांच्या वतीने आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजकुमार कांबळे होते, तर प्रा. शांताराम काळे, ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम आणि सुशांत घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्त्री मुक्ती आणि मानवी स्वातंत्र्याचे सर्वोत्तम योद्धा:

डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना प्रा. डॉ. पवार पुढे म्हणाले, “डॉ. आंबेडकरांनी भारत देशावर आजन्म प्रेम केले. ते निष्ठावंत मातृभक्त व देशप्रेमी होते. हजारो वर्षे विविध प्रकारच्या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला त्यांनी माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले. तत्कालीन पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांच्या गुलामीला पारावर उरला नव्हता. यासाठी त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ लिहून स्त्रियांना शिक्षण, मतदानाचा अधिकार, वारसाहक्क, घटस्फोट आणि सन्मानाने जगण्याचा संविधानात्मक अधिकार दिला.” डॉ. आंबेडकरांचे हे महान कार्य कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्यलढ्याएवढेच मोठे असून, ते मानवी मुक्तीसाठी लढणारे सर्वोत्तम योद्धा आहेत. आज भारतीयांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे:

यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. आंबेडकरांच्या उक्तीचा स्वीकार करून तरुणांनी आपली प्रगती करत समाजविकासाला महत्त्व दिले पाहिजे, असे सांगितले. तर अध्यक्षीय मनोगतात उद्योजक राजकुमार कांबळे यांनी, भारतीय समाजाने डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा सखोल अभ्यास करून व्यवसायनिष्ठ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे, असा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शांताराम काळे यांनी केले. या विचार प्रबोधन कार्यक्रमास भिलकटी परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ, स्त्री-पुरुष आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!