प्रचंड फायद्यात असलेल्या एलआयसीची विक्री कोणासाठी सुरू आहे ? कॉ. रमेश यांचा सवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । सातारा ।  आयुर्विमा महामंडळाचा ग्रोथ रेट ६४ टक्के  असताना शेअर व्हॅल्यू मात्र दिवसेंदिवस कमी दाखवली जात आहे. हे काय गौडबंगाल आहे ? जे सार्वजनिक उद्योग तोट्यात आहेत ते विकले जाणार होते. मात्र सद्या प्रचंड फायद्यात असलेली एलआयसी अर्थात आयुर्विमा महामंडळाची विक्री व खाजगीकरण सुरू करण्यात आलेले आहे. हे  कोणासाठी सुरू आहे असा सवाल अखिल भारतीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कॉ. व्ही. रमेश यांनी केला आहे.
सातारा येथील हॉटेल सुरूबन येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर मध्ये अखिल भारतीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी महासंघाच्या  पश्चिम विभागाचे २३ वे अधिवेशनात बोलताना कॉ. व्ही. रमेश यांनी वरील सवाल केला आहे.
उद्घाटन अखिल भारतीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस कॉ. श्रीकांत मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचार मंचावर झोनल प्रेसिडेंट कॉ. अनिल डोकपांडे ,झोनल सेक्रेटरी हितेंद्र भट , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ उदय नारकर , ज्येष्ठ नेते कॉ आर.एन. पटणे स्वागताध्यक्ष प्र सेवानिवृत्त प्र कुलगुरू प्राचार्य डॉ अशोक भोईटे , वसंतराव नलावडे  , सर्जेराव भुजबळ ,  कॉ संजय चव्हाण उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाला सार्वजनिक उद्योग नकोच आहेत त्यांना खाजगीकरणच हवे आहे असे सांगून कॉम्रेड व्ही.  रमेश म्हणाले की संपूर्ण देशाचा कारभार दोघेच दोघांसाठीच चालवत आहेत.
उद्घाटनपर भाषणात सरचिटणीस कॉ श्रीकांत शर्मा म्हणाले की देशातील एलआयसी सारखे सार्वजनिक उद्योग हे संपूर्ण देशाचे आहेत देशातील लोकांचे आहेत ते कोणत्याही एका पंतप्रधानांचे अथवा अर्थमंत्र्यांचे नाहीत हे लक्षात घ्यावे. आयुर्विमा महामंडळाची विक्री करू नका असे म्हणणारे देशद्रोही आहेत असे त्यांना हिणवले जाते असाही आरोप कॉ श्रीकांत शर्मा यांनी केला.
यावेळी कॉ उदय नारकर , कॉ अनिल घाटपांडे यांचीही भाषणे झाली. स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ अशोक भोईटे यांनी प्रास्ताविक केले.
कॉ. वसंतराव नलावडे यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर भानुदास गायकवाड, राजीव मुळ्ये ,  सलीम आतार व सहकार्यांनी क्रांती गीते सादर केली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील नगर ते हुतात्मा स्मारक पर्यंत प्रतिनिधींनी मिरवणूक काढून लाल झेंडे घेत हुतात्म्यांना वंदन केले. त्याचबरोबर पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

Back to top button
Don`t copy text!