ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. 23 पासून उमेदवारी अर्ज दाखल होणार; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.२२: फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून बुधवार दि. 23 ते बुधवार दि. 30 डिसेंबर दरम्यान सुट्टीचे दिवस वगळून दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत नवीन शासकीय धान्य गोदाम, शासकीय विश्राम गृहाशेजारी, फलटण येथे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.

उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज महा-ई-सेवा केंद्र अथवा अन्य संगणकीय यंत्रणेद्वारे भरुन त्याची प्रिंट काढून घ्यावी व नंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडून सदर परिपूर्ण अर्ज नवीन शासकीय धान्य गोदामात दाखल करावयाचा असल्याचे नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी सांगितले. नवीन धान्य गोदामात सर्व 80 ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी 48 टेबल लावण्यात येत आहेत.

ऑनलाइन उमेदवारी अर्ज 24 तास भरता येणार असून त्या दाखल उमेदवारी अर्जाची प्रत (प्रिंट) घेऊन त्यासोबत खालील दाखले, प्रमाणपत्र वगैरे कागदपत्रे जोडून त्यावर सह्या करुन परिपूर्ण अर्ज नवीन धान्य गोदामातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करावयाचा आहे. अर्जासोबत 1) ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला, 2) उमेदवार ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचा ग्रामसेवक यांचा दाखला, 3) शौचालय असल्याचे प्रमाणपत्र अथवा शौचालय वापराबाबत ग्रामसभेच्या ठरावासह प्रमाणपत्र, 4) 3 अपत्यांचे घोषणपत्र, (दि. 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे), 5) निवडणूकीसाठी स्वतंत्र बँक पासबुक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चालेल, 6) अनामत रक्कम भरल्याची पावती, 7) मत्ता व दायीत्व घोषणा पत्र, 8) गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेबाबत घोषणा पत्र, 9) जात वैधता प्रमाण पत्र किंवा जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती, 10) वयाचा पुरावा 21 वर्षे पूर्ण असावीत, 11) मतदार यादीतील मतदार असल्याचा पुरावा वरील सर्व दाखले, प्रमाणपत्र जोडून त्यावर आवश्यक तेथे सह्या करुन सदर परिपूर्ण उमेदवारी अर्ज नवीन धान्य गोदामात आपले ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करावयाचा आहे.

या सर्व दाखल अर्जांची छानणी गुरुवार दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजले पासून सुरु होईल, सोमवार दि. 4 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार असून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शुक्रवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत आवश्यक असेल तेथे मतदान घेण्यात येणार आहे. सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!