कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाकडे शेतकर्‍यांची ओढ!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | माणगाव |
महाराष्ट्रातील अनेक शेतकर्‍यांची सेंद्रिय शेतीकडे रूची वाढत असतानाच बुधवार, १८ ऑटोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत माणगाव, ता. कुडाळ येथे सेंद्रिय शेतीवर माहिती केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. सेंद्रिय शेतीचे भविष्य पाहता शेतकर्‍यांना विविध सेंद्रिय शेती पद्धती पोहोचाव्यात, हे या माहिती केंद्राचे उद्दिष्ट होते.

या माहिती केंद्रामध्ये जनावरांना कमी खर्चामध्ये पौष्टिक खाद्य म्हणून अझोला निर्मिती प्रकल्प तसेच गांडूळ खत निर्मिती, जीवामृत निर्मिती, दशपर्णी अर्क बनवण्याची प्रक्रिया या विषयावर व्याख्यान पार पडले. यासोबतच जैविक खते, बीजामृत, पंचगव्य यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

सदर माहिती केंद्रामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नारळ काढणी यंत्र, वैभव विळा, कोनोवीडर, नारळ सोलणी यंत्र, नूतन झेला इ. गोष्टी प्रदर्शित केल्या होत्या. यासोबतच संपूर्णा, आफ्रिकन टॉल, सीओ-३, पराग्रास या गवतांचे छायाचित्र प्रदर्शित केले गेले होते. या सर्व कार्यक्रमामध्ये कोकण कण्याळ शेळी व कोकण कपिला गाईचे माहिती सत्र विशेष आकर्षण ठरले.

विद्यापीठाच्या कृषी सह्याद्री गटाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नीळेली पशूपैदास केंद्र, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, ग्रामपंचायत माणगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कृषी सह्याद्री गटाचे सुबोध नलवडे, प्रतीक चेडे, श्रीकांत शिंदे, संकेत देशमुख, अथर्व नलवडे, रोशन पाटील, शिवम घरबुडे, गौरव मिसळ आणि यश पवार यांनी कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित तंत्रज्ञानाची माहिती सांगितली.


Back to top button
Don`t copy text!