दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । बारामती । बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड-३ यांनी शंभर वर्षाहून अधिक काळापूर्वी स्थापन केलेली बँक ऑफ बडोदा प्रथमपासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेने आज देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. बँकेने सर्व स्तरातील ग्राहकांसाठी विशेषता एमआयडीसी मधील उद्योग व्यवसायिकांकरिता अनेक बॅंकिंग सुविधा व अर्थसाह्याच्या विविध योजना उपलब्ध केल्या आहेत. उद्योगांसाठी एमएसएमई कर्ज, ईलेक्ट्रीक वाहन कर्ज, गृह कर्ज, कमर्शीयल व्हेईकल लोन्स, जेसीबी, पोकलेन इत्यादींसाठी कर्जपुरवठा चालू असून बारामती परिसरातील नागरिकांनी व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य प्रबंधक किरण जाधव यांनी केले आहे. बँक ऑफ बडोदाच्या ११६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बारामती मुख्य शाखेत एस एम ई लॉन्जचे उद् घाटन बिमा चे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या हस्ते करण्यात आले. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती इंडस्ट्रीयल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, जेष्ठ व्यवसायिक अनिलकुमार शहा, विलास नलावडे, आदेश शहा, महादेव गायकवाड, अरुण म्हसवडे, भाऊसाहेब तुपे, अंकुश झेंडे, विजय सोळसकर आदि मान्यवर तसेच बॅंकेचे ग्राहक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी बॅंक ऑफ बडोदा तर्फे देण्यात येणाऱ्या विविध डिजिटल सोई सुविधांचे कौतुक केले व बॅंकेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार म्हणाले बारामती परिसरात औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. बँक ऑफ बडोदा मार्फत देण्यात येणाऱ्या बॅंकिंग सोईसुविधा मुळे उद्योजकांच्या व्यवसायास निश्चितच सुलभता आणि गती मिळेल. बारामतीमधील व्यवसायिक व उद्योजकांनी यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बॅंकेचे वरिष्ठ प्रबंधक भरत खाडे यांनी सर्वांचे आभार मानले.