महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । नवी दिल्ली । राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री. शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांची पत्नी वृषाली शिंदे, नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.

मुख्यमंत्री यांनी सांगितले, भेटी दरम्यान कुटुंबियांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिले.

प्रधानमंत्री यांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत सहवेदना करून या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठिशी उभे असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.

धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी व्यक्त केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही प्रधानमंत्री यांनी विचारपूस केली. कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का? याबाबतही चर्चा करण्यात आली. मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!