जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाला यश, सुदानमध्ये अडकलेले नागरिक परत येण्यास सुरुवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०४ मे २०२३ । सांगली । सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये केनान शुगर कंपनी लि.  मध्ये कार्यरत असलेल्या सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० नागरिकांशी  जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे.  येथील सर्व नागरिक सुखरूप असून भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुमारे ९५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परत आलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील  नागरिकांचा समावेश आहे. सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी व त्यांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यावर अधिकाऱ्यांची ‍नियुक्तीही जिल्हा प्रशासनाने केली आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालय सध्या सुदानमधील केनाना शुगर कंपनी लि.मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रवासी गटा सोबत संपर्कात आहे. येथे साधारण ४०० भारतीय नागरिक कार्यरत असतात आणि त्यापैकी १०० ते १२० नागरिक हे सांगली जिल्ह्याचे आहेत असे कळते. नागरिकांनी स्थलांतराच्या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि केनाना साखर कारखान्याच्या साईटवरून पोर्ट सुदान आणि पुढे त्यांच्या सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी भारतीय दूतावासाला केली आहे.

एक्सपॅट्सच्या म्हणण्यानुसारकेनाना शुगर कंपनी लि. सर्व भारतीयांना सोडण्यास तयार आहेपरंतु कंपनीकडे सध्या त्यांना कंपनीच्या ठिकाणाहून पोर्ट सुदानपर्यंत नेण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाहीजे सुमारे १२०० कि.मी. दूर आहेत. कंपनीने सुचवले आहे की, प्रवाशांनी त्यांच्या समस्येबद्दल भारतीय दूतावासाला कळवावे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने हे प्रकरण गांभीर्याने व संवेदनशिलपणे घेत केनाना साखर कारखाना साईट ते पोर्ट सुदान आणि पुढे जाणाऱ्या भारतीयांसाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक संपर्क भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुदानमध्ये आपल्या नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मार्फत झालेल्या पाठपुराव्यानुसार सुदान देशातील शुगर फॅक्टरीत अडकलेल्या ३७० भारतीयांपैकी ९५ लोकांची पहिली बॅच भारताकडे आली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तानाजी पाटील, जितेंद्र डोळ, सागर जाधव, संदीप खराडे, राजू भुजबळकर, राजाराम पाटील, श्रीकांत पाटील यांचा समावेश आहे.

यातील तानाजी पाटील (रा. सुर्यगांव, ता. पलूस) यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुदानमध्ये अडकलेले नागरिक सुखरूप आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहे. भारतीय दुतावास सर्वोतोपरी मदत करत असून नागरिकांना इर्मजन्सी पासपोर्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या विमानाने आम्हाला भारतात आणले असून आमचा प्रवास सुखरूप झाला आहे. आज सायंकाळी दुसरी बॅच सुदानमधून बाहेर पडत असून त्यात जिल्ह्यातील १५ ते २० नागरिकांचा समावेश असेल. जवळपास ४०० पैकी ३०० नागरिक सुदानमधून बाहेर पडणार असून ७० ते ७५ नागरिक स्वत:च्या जबाबदारीवर सुदानमध्येच राहण्याच्या तयारीत आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने संपर्क ठेवत दिलेला धीर व केलेल्या मदतीबद्दल यावेळी त्यांनी अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!