विडणी: मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेचा प्रारंभ – पुराचा धोका टळणार


विडणी गावात मान्सूनपूर्व ओढे, नाले स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने ही पावले उचलली आहेत.

स्थैर्य, विडणी, दि. २१ मे : विडणी गावात सरपंच सागर अभंग यांच्या सूचनेनुसार मान्सूनपूर्व ओढे, नाले आणि चाऱ्या स्वच्छ करण्याच्या मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक तीनमधील कोल्हे मळा येथून या कामाला सुरुवात झाली.

ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी पावले

गेल्या काही वर्षांत अवकाळी आणि मान्सूनच्या अतिवृष्टीवेळी ओढे व नाल्यांमधील अडथळ्यांमुळे पावसाचे पाणी लोकवस्तीत शिरले होते. यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून यंदा पावसाळ्यापूर्वीच सर्व जलस्रोतांची स्वच्छता करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.

संपूर्ण गावाची होणार स्वच्छता

लवकरच संपूर्ण गावातील ओढे, नाले आणि चाऱ्यांची स्वच्छता मोहीम पूर्ण करून पाण्याचे प्रवाह सुरळीत केले जाणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे यांनी दिली. या स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभाप्रसंगी पंचायत समिती सदस्य सचिन अभंग आणि माजी सरपंच शरद कोल्हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!