फलटण: दफनभूमीत अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा – आंदोलनाचा इशारा


फलटणमधील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीत अडथळा आणणाऱ्या रामभाऊ मदने व त्यांच्या कुटुंबावर कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २१ मे : फलटण शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीत बेकायदेशीरपणे मालकी हक्क सांगून मृतदेहाच्या दफनविधीत अडथळा आणणाऱ्या रामभाऊ मदने आणि त्यांच्या कुटुंबावर तात्काळ कडक कारवाई करावी. प्रशासनाने या प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला.

ऐतिहासिक पुरावे आणि कायदेशीर निकाल

शहरातील मुधोजी कॉलेजसमोर असलेल्या गट नंबर ६४ ब मध्ये गेल्या १०० वर्षांपासून लिंगायत समाजाची दफनभूमी आहे. या ठिकाणी १९२४ मधील समाधीचा शिलालेख आणि ६० ते ७० समाध्यांचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. या जागेबाबत तहसीलदार न्यायालयानेही लिंगायत समाजाच्या बाजूने निकाल दिला आहे. तसेच, २००७ मध्ये शहरातील रिंगरोडचे काम करताना नगरपालिकेने समाजाची रीतसर मान्यता घेतली होती.

हे सर्व कायदेशीर पुरावे असतानाही रामभाऊ मदने कुटुंबासह येऊन दफनविधीत बेकायदेशीर अडथळा आणतो आणि अरेरावी करत मारण्याची धमकी देतो, अशी माहिती समाजाचे प्रतिनिधी राजाराम फणसे, प्रा. सतीश जंगम आणि विजय गाडे यांनी दिली. यावेळी संजय खांडेकर, धन्यकुमार सतुटे आणि राहुल उदांडे उपस्थित होते.

पोलिसांच्या मदतीने पार पडला दफनविधी

नुकतेच १८ मे रोजी एका मृतदेहाच्या दफनविधीवेळी मदने कुटुंबाने अशीच अडवणूक केली. हा विषय संवेदनशील असल्याने रात्री ११ वाजता फलटण पोलीस आणि महसूल प्रशासनातील तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून त्या कुटुंबाला बाजूला केले. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने दफनविधी पार पडला. मात्र, या वादामुळे मृतदेह चार-पाच तास ताटकळत ठेवावा लागल्याने समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांत गुन्हे दाखल

रामभाऊ मदने आणि त्यांच्या परिवारावर यापूर्वीच फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेळा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार गुन्हे दाखल होऊनही त्यांची अरेरावी थांबलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला चंद्रकांत मेनकुदळे, बाळासाहेब सावंत, तानाजी करळे, विशाल बाजारे, विलास मुजुमले, संजय शिपटे, अमित निदान आणि धनंजय रणसिंग यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!