फलटण एसटी आगारात दुर्गंधीचे साम्राज्य: चेंबर तुंबल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

फलटण बसस्थानकातील स्वच्छतागृहाचे चेंबर तुंबल्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून प्रवासी आणि एसटी कँटीनमधील कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २२ जून : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्यात आली आहेत. मात्र, फलटण एसटी आगारात स्वच्छतेच्या नियमांचा बोजवारा उडाला असून स्वच्छतागृहाचे चेंबर तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याचा नियम आहे. असे असताना फलटण आगारात या नियमाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून येथील स्वच्छतागृहाचे चेंबर पूर्णपणे तुंबलेले आहे. याव्यतिरिक्त जवळच असलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने स्वच्छतागृहाचे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात पसरले आहे.

या सांडपाण्यामुळे आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानकातील प्रवासी, रिक्षाचालक आणि मालक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः स्वच्छतागृहाशेजारीच एसटीचे कँटीन असल्याने तेथील कामगारांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाकावर रुमाल ठेवूनच वावरावे लागत आहे.

प्रवाशांचे आरोग्य अधिक धोक्यात येण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेणे आवश्यक आहे. तुंबलेले चेंबर तत्काळ मोकळे करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी प्रवासी आणि रिक्षाचालक वर्गातून केली जात आहे.

Back to top button
Don`t copy text!