दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण | मुगूटराव कदम |
फलटण व परिसरात महादेवाची १३ ते १४ मंदिरे आहेत. त्यापैकी वनदेवशेरी व सोनवडी बु. येथे शिंगणापूर रोडवर महादेव मंदिर असून सोनवडी बु. येथील मंदिराचे बांधकाम यापूर्वीच पूर्ण झाले आहे, तर वनदेवशेरी येथील नंदी व महादेवाची पिंड उघड्या स्वरुपात आहे. यंदा ७१ वर्षांनी श्रावण मासाची सुरुवात सोमवाराने (दि. ५ ऑगस्ट) झाली असून मासाचा शेवटही सोमवारानेच झाला आहे. हा एक दुर्मिळ योग आहे. शेवटच्या सोमवारी दर्शनासाठी ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.
श्रावण महिन्यात शंकरासाठी केलेली पूजा लाभदायक असते, अशी भावना श्रद्धांळूंची आहे. श्रावण अमावस्या व मंगळागौरी या मंगळवारी येत असल्या तरी अमावस्येची समाप्ती ही मंगळवारी झाल्याने सोमवारची अमावस्या ही दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या, मातृदिन, शनैश्वर शिंगणापूर अभिषेक, श्रावणी सोमवार, शिवपूजन, शिवमुठ – सातू या पद्धतीने भाविक आपल्या श्रद्धेनुसार, कुवतीनुसार साजरी करतात.
फलटणमधील नागेश्वर मंदिर फलटण पंचायत समितीच्या विरुद्ध बाजूस व जुन्या बारामती रोडच्या दक्षिण बाजूस असून ते पश्चिमुखी आहे. या मंदिरातील मुख्य गाभार्यात पंचधातूची मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम हे संस्थानकालीन काळात झाले असून नागेश्वर महादेव यांची स्वयंभू पिंड आहे. प्रदक्षिणेसाठीही मंदिराभोवती जागा आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारचे महत्त्व जाणून या मंदिराच्या मुख्य गाभार्याबाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या शेवटच्या सोमवारचे महत्त्व जाणून फलटण शहर व परिसरातील श्रद्धाळू व्यक्तींनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतल्याचे दिसून आले.
शहरातील श्रीराम मंदिराच्या परिसरात असलेले शिवमंदिर, रंगारी महादेव मंदिर, तेली गल्ली येथील महादेव मंदिर, मलठणमधील दोन महादेव मंदिरे, संत नामदेव महाराज मंदिराचे पश्चिमेकडे बाजूस असलेले महादेव मंदिर, त्याचप्रमाणे श्रीराम कारखान्याच्या पूर्वेस व खडकहिरा ओढ्याच्या पुलाचे उत्तरपासून असलेल्या व यासह अन्य ठिकाणच्या महादेव मंदिरातही भक्तगणांनी गर्दी करून महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
७१ वर्षांनंतर दुर्मिळ योग आलेल्या यंदाच्या श्रावण मासाची सांगता झाली असून दरम्यान, सायंकाळी ४ ते ६ दरम्यान आलेल्या पावसाच्या सरींमुळे काही भाविकांना वेळेत दर्शन घेता आले नाही.