दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील होलार समाजामध्ये भूमीहिन व बेघर लोकांचे प्रमाण जास्त आहे. या भूमीहिन व बेघर लोकांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा, मुलांच्या शिक्षणाचा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. परिणामी होलार समाज विकासाच्या प्रवाहातून लांब आहे. त्यामुळे अशा लोकांना शासकीय जमीन व घरकुलांचा लाभ मिळावा, अशी मागणी फलटण तालुका होलार समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, समाजातील भूमीहिन, बेघर लोकांना शासकीय, गायरान, गावठाणातील जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा.
या निवेदनावर फलटण तालुका होलार समाज संघटनेचे बबनराव करडे, संघटनेचे अध्यक्ष नारायण आवटे, सदस्य महेंद्र गोरे, अशोक आवटे, निखिल आवटे, दत्तात्रय आवटे, अंकुश आवटे यांच्या सह्या आहेत.