बिबट्याने हल्ला केलेल्या स्थळाची पाहणी करताना ग्रामस्थ व वन विभागाचे कर्मचारी.
स्थैर्य, नागठाणे, ता.९ : भरतगाववाडी (ता. सातारा) येथे गेले सहा महिन्यांपासून सुरु असलेला वावर अद्यापि कायम आहे. बिबट्याचे भयदेखील संपता संपत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आता कॅमेरे लावले आहेत.
परिसरातील भरतगाववाडी गावालगतच्या डोंगरक्षेत्र परिसरात गेले सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. गेल्या काही दिवसांत या बिबट्याने शिवारात असलेल्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यांना आपले लक्ष्य बनविले अाहे. अलीकडेच पिकास पाणी देण्यासाठी जाणाऱ्या श्रीकांत मोहिते, प्रकाश पवार या शेतकऱ्यांना अगदी काही अंतरावरच बिबट्याचे दर्शन झाले. या वेळी बिबट्याने वस्तीवरील एक पाळीव कुत्रा तोंडात धरलेला होता. मात्र प्रसंगावधान राखून या दोघांनी दुचाकीची हेडलाईड लावून हॉर्नचा मोठा आवाज केल्यामुळे बिबट्याने भक्ष्य सोडून तिथून पलायन केले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागास दिली. ग्रामपंचायतीमार्फतही निवेदन देण्यात आले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कुशल पावरा, भरतगाव विभागाचे वनरक्षक राज मोसलगी यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याच्या पावलांची पाहणी केली. घटनेनंतर परिसरात वन विभागाने दोन कॅमेरे लावले आहेत. या वेळी तंटामुक्ती गाव समितीचे माजी अध्यक्ष जयवंत बागल, प्रकाश पवार, श्रीकांत मोहिते, प्रसाद घाडगे, अक्षय घाडगे, अतुल पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवारात जाताना शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.