रक्तदानाच्या आवाहनाला कर्तव्य सोशल ग्रुपचा मोठा प्रतिसाद सौ. वेदांतिकाराजे यांच्यासह ६२ रक्तदात्यांनी केले रक्तदान


 

छ. शाहू अकॅडमी येथे रक्तदान शिबीराच्या उदघाटनप्रसंगी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि कर्तव्य सोशल ग्रुपचे सदस्य

स्थैर्य, सातारा, दि.९: कोरोना महामारीने संपुर्ण जगाला विळखा घातला असून मानवी जीवनावर भयंकर संकट ओढावले आहे. त्यातच रक्ताचा तुटवडा असल्याने मोठी जीवीत हानी होत आहे. गरजू रुग्णांसाठी रक्त कमी पडू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मार्फत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कर्तव्य सोशल ग्रुपने मोठा प्रतिसाद दिला असून ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह ६२ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.

कर्तव्य सोशल ग्रुप आणि माऊली ब्लड बँक यांच्यावतीने आणि छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप यांच्या सहकार्याने छ. शाहू अकॅडमी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत झालेल्या शिबीरात सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह ६२ जणांनी रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. 

आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना आजच्या धावपळीच्या युगात कमी होत चालली आहे. प्रत्येकजण आपआपल्या कार्यात व्यस्त असतो. मात्र, कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या आजाराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्ताच्या तुटवड्यामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा होत नाही आणि रक्त नाही म्हणून रुग्णांना प्राण गमवावा लागणे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी थोडावेळ काढून रक्तदान केले पाहिजे. आपले रक्त कोणाचातरी प्राण वाचवणारे असते त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे मत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी शिबीराच्या उदघाटनप्रसगी व्यक्त केले. तसेच अडचणीच्या काळात रक्तदान करुन प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला सहकार्य करणार्‍या रक्तदात्यांचे सौ. वेदांतिकाराजे यांनी आभार मानले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप विलास कासार, विजय देशमुख, चंदन घोडके, दिलावर पत्रेवाले, जितेंद्र मोहिते, रवी पवार, राजा महाडीक, प्रकाश नाईक, महेश यादव, नरेंद्र जाधव, राहूल धनावडे तसेच मराठा साम्राज्य ग्रुपचे ओंकार देशमुख, सूर्यकांत मोहिते यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!