शिरवळच्या सरपंचसह 52 जणांनवर गुन्हा; जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग काढली विजयी मिरवणूक


 

स्थैर्य, खंडाळा, दि.२०: शिरवळ ता खंडाळा येथील विशेष ग्रामसभेमध्ये सरपंच अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर सातारा जिल्हाधिकारी व शिरवळ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करीत विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरेसहित ५२ जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यासहित विविध कलमांखाली शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

         याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील शिरवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याविरुद्ध ज्ञानसंवर्धिनी प्रशाला याठिकाणी अविश्वास प्रस्तावावर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशान्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे त्यानुसार शिरवळ पोलीसांकडून सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विजयी मिरवणूक काढणेबाबाबत बंदी घालण्यात आली होती.

            दरम्यान, शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याविरुद्ध असणारा अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढलेल्या आदेशांबाबाबत शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांना विजयी मिरवणूक न काढणेबाबत नोटीस बजावल्या होत्या . तरीही शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे ,भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी,शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने,भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाप्रमुख राहुल हाडके,इम्रान उर्फ पप्पू कलाम काझी,अजिंक्य उर्फ पप्पू अलबत कांबळे, शरद शंकर ताटे,भारतीय जनता पार्टीचे शिरवळ शहराध्यक्ष नीळकंठ चंद्रकांत भुतकर, सागर सुरेश पानसरे ,समीर रवींद्र पानसरे ,खंडाळा पंचायत समिती माजी उपसभापती सारिका प्रदीप माने,ग्रामपंचायत सदस्या कविता चंद्रकांत माने , चंद्रकांत रामदास माने, चिराल नामदेव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य महेश नामदेव जाधव, शुभम गणेश गुंजवटे, सनी विजय टापरे , मुज्जमील रमजान उर्फ मुन्ना शेख, अमोल पानसरे, दत्तप्रसाद श्रीनिवास राठी, उमाकांत विजयकुमार राठी, बंडू भिसे यांच्यासह इतर २५ ते ३० जणांनी मिरवणूक काढून विजयाच्या घोषणा देऊन ,फटाके फोडून गुलाल उधळत कोणत्याही प्रकारे सामाजिक अंतर न ठेवता सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाचा व शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी बजावलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यासह तब्बल ५२ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           याबाबतची फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार हे करीत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!