माकप कडून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बैठकीचा निषेध – आ. विनोद निकोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, डहाणू, दि. १३ : पालघर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात सिस्को वेबेक्स या अप्लिकेशनच्या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पुनर्वसन व पुनर्स्थापना समितीच्या घेण्यात आलेल्या बैठकीला डहाणू विधानसभा आ. विनोद निकोले यांनी विरोध दर्शविला असून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

आ. निकोले म्हणाले की, कोरोना काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले असून अनेक लोक बेरोजगार झाले असून त्यामुळे शेतीचे महत्त्व जास्तच अधोरेखित झाले आहे. या भागातील आदिवासींकडे अतिशय कमी शेती आहे. त्यामुळे आदिवासींचा उदरनिर्वाह करण्याचे शेती हे एकमेव साधन आहे. तसेच जमीन संपादित झाल्यानंतर मिळालेले पैसे किती काळ टिकणार आहेत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर, चर्चगेट ते डहाणू लोकल सेवेत अधिक सुधारणा करावी अशी सूचना त्यांनी केली. यावेळी बुलेट ट्रेन कडे पेक्षा कोरोना महामारीच्या काळात कोरोनाकडे शासनाने पूर्ण लक्ष दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मुंबई अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये आदिवासी भागातील डहाणू मधील 16, तलासरी मधील 7, पालघर मधील 27 तर वसई मधील 21 अशी एकूण 71 गावे असून त्यांत हजारो शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे. म्हणूनच या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, कष्टकरी संघटना, भूमी अधिकार आंदोलन व अन्य पक्ष-संघटनांनी वेळोवेळी विरोध केला असून त्याविरुद्ध सातत्याचे आंदोलनही केले आहे, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगत या बैठकी बरोबर सदर बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही निषेध व्यक्त केला. दरम्यान बैठकीत सर्व ग्रामपंचायतींना बोलण्याची संधी देण्यात आली. अनेक ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाचा जोरदार निषेध नोंदवला. तर, जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर भाषा बोलून बैठकीला संबोधित केले.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व पंचायत समिती पदाधिकारी, सर्व सरपंच, खा. राजेंद्र गावित, आ. विनोद निकोले, आ. श्रीनिवास वनगा, आ. राजेश पाटील, बुलेट ट्रेन कार्यकारी मनीषा गिंभल आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!