टोलनाक्यांच्या परिसरात उभारले जाणार ‘शेतकरी बाजार’; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा महत्त्वपूर्ण पुढाकार


स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट ग्राहक मिळावा आणि मध्यस्थांची साखळी मोडावी, यासाठी राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलनाक्यांच्या परिसरात ‘शेतकरी बाजार’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ७ : स्थानिक शेतकऱ्यांना नवा आर्थिक स्रोत निर्माण व्हावा आणि त्यांच्या शेतमालाला हक्काचा ग्राहक मिळावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) टोलनाक्याजवळील जागा शेतीमाल विक्रीसाठी भाड्याने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येथे ‘शेतकरी बाजार’ हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या कार्यवाहीला सुरुवात होणार आहे.

काय आहे संकल्पना?

राज्यातील रस्त्यांसह महामार्गांचे काम आता ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’ (BOT) या तत्त्वावर सुरू आहे. रस्त्यांचा खर्च वसूल करण्यासाठी उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. अनेकदा या ठिकाणी फळे, पाणी आणि नाश्त्याच्या पदार्थांची विक्री केली जाते. याच परिसरात जर स्थानिक शेतकऱ्यांना हक्काची जागा दिली, तर त्यांनाही व्यवसायासाठी एक मोठे व्यासपीठ मिळेल, या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राज्यातील सर्व टोलनाक्यांच्या परिसरात राबवण्याचे नियोजन आहे.

शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी संपर्क साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मध्यस्थांचा (दलालांचा) हस्तक्षेप कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या मालाला योग्य दर मिळण्याची शक्यता वाढेल. तर दुसरीकडे, प्रवाशांना व ग्राहकांनाही ताजी आणि दर्जेदार कृषी उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येतील.

प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेचा उपयोग करून हा बाजार उभारला जाणार असल्यामुळे, शहरातील गर्दीच्या ठिकाणांपासून काहीसा दूर मात्र सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होईल. टोलनाक्याजवळील जागा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर असल्याने चांगले ग्राहक मिळण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला हा उपक्रम मर्यादित स्वरूपात राबवून त्याचे परिणाम तपासले जातील. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात इतर ठिकाणीही असे बाजार सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे.

प्रस्तावित ‘शेतकरी बाजारा’ची ठळक वैशिष्ट्ये :

  • हक्काची बाजारपेठ: शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल.

  • जागेची उपलब्धता: टोलनाक्याजवळ नाममात्र भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिली जाईल.

  • प्रवाशांची सोय: टोलवरून प्रवास करताना नागरिकांना आणि प्रवाशांना सहजपणे ताजा भाजीपाला खरेदी करता येईल.

  • थेट विक्री: ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ अशी पारदर्शक विक्री व्यवस्था निर्माण होईल.

  • शोषणाला आळा: शेतकऱ्यांची मध्यस्थांमार्फत होणारी आर्थिक लूट कायमची थांबेल.


Back to top button
Don`t copy text!