काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांच्या मुंबई, दिल्लीसह १५ मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.५: काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयनं आज छापेमारी केली. शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयनं धाडी टाकल्या. यात बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली.

कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आहे. याप्रकरणी सीबीआयनं कर्नाटकातील नऊ, दिल्लीतील चार आणि मुंबईतील एक अशा शिवकुमार यांच्या १५ ठिकाणांवर आज धाडी टाकल्या.

सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकांनी बंगळुरूतील सदाशिवनगरमधील डीके शिवकुमार यांच्या, तर खासदार डीके सुरेश यांच्या कनकपुरा आणि बंगळुरूमधील मालमत्तांवर छापे टाकले. सीबीआय पोलीस अधीक्षक थॉमस जॉस यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी सकाळी सहा वाजता धाडी टाकत झाडाझडती सुरू केली. या कारवाईसंदर्भात सीबीआयनं रविवारी सायंकाळीच विशेष न्यायालयाकडून परवानगी मिळाली होती. सर्वच ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू असून, या कारवाईवर काँग्रेसनं टीका केली आहे.

दरम्यान, शिवकुमार आणि त्यांचे बंधू सुरेश यांच्या मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये ५० लाख रुपये सापडल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयकडून अजून झाडाझडती घेतली जात आहे.

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी टीका केली आहे. “भाजपा नेहमीच सूडाचं राजकारण करते आणि जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करते. डीके शिवकुमार यांच्या घरांवर सीबीआयकडून करण्यात आलेली छापेमारी पोटनिवडणुकीसाठी आम्ही केलेली तयारी निष्प्रभ ठरवण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. मी यांचा तीव्र निषेध करतो,” सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!