
स्थैर्य, सातारा, दि.५: शिवाजी विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीमहाराज संशोधन केंद्र सुरू करण्यात यावे. या केंद्राच्या माध्यमातून मराठा साम्राज्याची भारतीय इतिहासातील कामगिरी या विषयावर संशोधन व्हावे, अशी मागणी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात अमित कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यापीठ असून विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बहुसंख्य मुलांना शिक्षणाची गंगोत्री उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्या दैदीप्यमान इतिहासाचा अभ्यास देखील शास्त्रीय पध्दतीने व्हावा. यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात यावी.
छत्रपती संभाजी महाराजांचे काम हे असामान्य असून त्याचे कार्यकर्तृत्व हे दैदिप्यमान आहे. शिवकालानंतर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मराठ्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. त्याविषीचे अनेक पैलू अद्याप अंधारात असून त्याविषयी संशोधन होणे आवश्यक वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये मराठा साम्राज्याने संपूर्ण भारतात आपला एक वेगळाच दरारा निर्माण केला होता. त्यांची कारकिर्द ही अत्यंत जाज्वल्य अशी ठऱलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम व बलिदानातून ऊर्जा घेऊन दिलेला स्वातंत्र्य लढा अधिक शास्त्रीय आधारांनी समाजापुढे यावा, यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीमहाराज संशोधन केंद्र सुरू करून मराठा साम्राज्याची भारतीय इतिहासातील कामगिरी असे संशोधन व्हावे.