
स्थैर्य, मुंबई, दि.१५: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सामन्य नागरिकांना दिलासा मिळवा तसेच कोविड-19 वरील उपचार परवडावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राजेश टोपे यानी ट्विट करत म्हटले आहे की, ‘कोविड-19 च्या निदानासाठी सिटीस्कॅन (HRCT)चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे खाजगी रुग्णालयामार्फत यासाठी 10 हजार पेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणाऱ्या दरात सिटीस्कॅन (HRCT)चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी यासाठी सिटीस्कॅन चे कमाल दर निश्चित करणे संदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ आहे. असे असताना अनेक रुग्ण हे कोरोनावर मात करुन घरीही परत येत आहे. दरम्यान अनेकांना रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिलं भरावी लागत आहे. हे लक्षात घेत राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर कमी केले आहे. तसेच आता सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली आहे.