मराठा क्रांती मोर्चाच्या चौधरवाडी, फडतरवाडी, खुंटे व शिंदेवाडी शाखांचे महिलांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन


दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२३ | फलटण |
मराठा क्रांती मोर्चा फलटण संचलित चौधरवाडी, फडतरवाडी, खुंटे व शिंदेवाडी शाखांचे उद्घाटन मोठ्या थाटात स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ व ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून जात आता राजकारणविरहित समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येऊन मराठा समाजप्रती सेवेची परंपरा अखंड पुढे नेऊ, अशी प्रतिज्ञा केली व यापुढे संपूर्ण फलटण तालुक्यातील मराठा समाजाच्या सुखदुःखात सहभागी होऊन ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आता एक मराठा कोटी मराठा’ करूया, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, आज रविवार, दि.१२ मार्च रोजी रंग पंचमीच्या शुभमुहूर्तावर सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पहिली शाखा चौधरवाडी येथे स्थापन करण्यात आली. त्या शाखेचे उद्घाटन चौधरवाडी गावातील मराठा भगिनींच्या हस्ते करण्यात आले. तसेच दुसरी शाखा फडतरवाडी येथे व तिसरी शाखा खुंटे व चौथी शाखा शिंदेवाडी येथे या विविध शाखांचे उद्घाटन मराठा समाज व महिला भगिनींच्या शुभ हस्ते झाले.दरम्यान, यावेळी चौधरवाडी, फडतरवाडी, खुंटे व शिंदेवाडी येथील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत शाखांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने एक ध्येय गाठण्यासाठी ‘गाव तिथे शाखा व शाखा तिथे एकत्र तर सर्वत्र’ या भावनेतून आत्तापर्यंत तब्बल पंचवीस शाखा स्थापन करण्यात आल्या असून अजून शंभर शाखांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्वच समन्वयक राजकारणविरहित समाज एकवटण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. समाजातील तरुण व मार्गदर्शक तसेच महिला यांचा सहभाग नोंदविला जात असून मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला फलटण तालुका असून छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी तर धर्मवीर संभाजीराजे यांचे आजोळ असलेल्या या फलटणमधून एक मोठी क्रांती घडवून आणली जात आहे. आपल्या मराठा समाजाला एका छताखाली आणून एकमेकांना मदतीचा हात दिला जाणार असल्याने व प्रथमच सर्व समन्वयकांनी स्पष्ट केले आहे की, हा मोर्चा व निघत असलेल्या शाखा या राजकारणविरहित असून कोणी कुठेही राजकारण करा, मात्र मराठा जात समोर आली की, सर्वांनी एकत्र यायचेच असे सांगितले असल्याने संपूर्ण फलटण तालुक्यातील गावे व मराठा समाज भरभरून प्रतिसाद देत आहे.


Back to top button
Don`t copy text!