
स्थैर्य, फलटण, दि. १ मे : माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, माऊली फाउंडेशन आणि फलटण पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष ‘आधार कार्ड कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प उद्या, शनिवार, दि. २ मे रोजी सकाळी १० वाजता नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या संपर्क कार्यालयात पार पडणार आहे.
सध्या सर्वच शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक झाले आहे. हीच गरज ओळखून सर्वसामान्य नागरिकांची सोय व्हावी या उद्देशाने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ६ महिने ते १८ वर्षे वयोगटातील व्यक्तींना मोफत नवीन आधार कार्ड काढून देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, ज्या नागरिकांच्या आधार कार्डमध्ये काही त्रुटी आहेत, त्यांच्यासाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आधार कार्डवरील जन्मतारीख बदलणे, फोटो अपडेट करणे, तसेच नावातील बदल यांसारखी महत्त्वाची कामे या एकाच ठिकाणी त्वरित करून मिळणार आहेत.
तरी फलटण शहरातील आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या आधार कार्ड शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
