कोरेगावातील गांजा तस्करीचे माळशिरस तालुक्यात उगमस्थान पिलीवनजिकच्या काळमळमधून एकाला अटक; सुमारे तीन लाख रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त


 


स्थैर्य, कोरेगाव, दि. १७ : कोरेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात गांजा तस्करीचे रॅकेट आयपीएस रितू खोखर यांनी उध्दवस्त केल्यानंतर आता रॅकेटच्या मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. खटाव आणि माण तालुक्यातील प्रत्येकी दोघांना अटक केल्यानंतर आता गांजा जेथून सप्लाय केला जातो, त्या ठिकाणी म्हणजेच काळमळ (पिलीव), ता. माळशिरस येथे बुधवारी रात्री धडक कारवाई करत मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ९५ हजार ४१० रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सुत्रधाराला मात्र कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सातारा-लातूर महामार्गावर चिमणगाव गोठ्यानजिक होंडा ऍक्टिव्हा स्कुटरवरुन गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती रितू खोखर यांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. त्यांनी विशेष पथक तयार करुन होंडा ऍक्टिव्हा स्कुटर क्र. एम. एच. ११-बी. वाय.-३०९१ वरुन चाललेल्या हसिम नजीर झारी व सचिन तुकाराम मदने, दोघे रा. पुसेगाव यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या कबज्यातून ४ किलो १८५ ग्रॅम वजन असलेला गांजा जप्त केला. त्यांच्याकडील मोबाईल हँडसेटसह एकूण ७७ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. 

त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी दहिवडीतील बाजार पटांगणाजवळ राहत असलेल्या सुनील किसन जाधव व प्रकाश अशोक जाधव यांच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली होती. रितू खोखर यांच्या पथकाने त्याच रात्री दहिवडीत धडक कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्या घर झडतीमध्ये ६३ हजार ५७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्या विरुध्द कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. 

तपासादरम्यान दहिवडीतील दोघांनी काळमळ (पिलीव), ता. माळशिरस येथील लक्ष्मण रामू जाधव याच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर बुधवारी रात्री रितू खोखर यांच्या पथकाने काळमळ (पिलीव) येथे छापा टाकून जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ९५ हजार ४१० रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस अधिकारी रितू खोखर, उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे, हवालदार विजय जाधव, पोलीस नाईक धनंजय दळवी, अमोल सपकाळ, किशोर भोसले, कर्मचारी साहिल झारी, इंद्रजित भोसले, अजय गुरव, तुषार बाबर, निलेश जांभळे, शंकर पांचागणे यांच्यासह होमगाडर्सच्या पथकाने ही कारवाई केली. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!