बृहन्महाराष्ट्राने निर्माण केली महाराष्ट्राची सशक्त प्रतिमा – ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे


स्थैर्य, मुंबई, दि.२४: महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्व करत राज्याच्या साहित्य, संस्कृती  व्यवहाराला पुढे आणण्याचे कार्य करणाऱ्या बृहन्महाराष्ट्राच्या चळवळीने राज्याची सशक्त प्रतिमा निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन पणजी (गोवा) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक प्रभाकर ढगे यांनी आज केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना ‘बृहन्महाराष्ट्रातील महाराष्ट्र’ या विषयावर श्री ढगे बोलत होते.

बृहन्महाराष्ट्रातील महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्व करत साहित्य, सांस्कृतिक  व्यवहाराला पुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे म्हणूनच देश व परदेशात ही  महाराष्ट्राची शक्तिस्थळे  ठरली असल्याचे श्री. ढगे म्हणाले. अन्य राज्यात मराठी माणसांची  विविध क्षेत्रातील घौडदौड महाराष्ट्राला पूरक आहे.अखिल भारतीय साहित्य महामंडळ,विश्व साहित्य संमेलन या माध्यमातूनही बृहन्महाराष्ट्रात सुरु असलेल्या कार्याला जोडण्याचे व महाराष्ट्र संस्कृतीचे विश्वव्यापी काम झाल्याचे त्यांनी सांगिलते. तसेच या कार्यास  महाराष्ट्रातील जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो याची अपेक्षा व प्रतीक्षाही बृह्ममहाराष्ट्रातील जनतेला असते असे ते म्हणाले. देशाच्या विविध प्रांतात व परदेशात आपले स्वत:चे स्थान निर्माण करत असताना आपल्या संस्कृतीला सतत जपणाऱ्या बृहन्महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्रातील जनतेकडूनही काही सहकार्य मिळण्याची वा त्‍यांच्या सादाला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी संस्कृती व मराठी भाषेचा प्रसार व संवर्धन करण्यासाठी मराठी नियतकालिके, मराठी शाळा-विद्यालये, ग्रंथालये, संशोधनकार्य आदींच्या माध्यमातून बृहन्महाराष्ट्रात सुरु असलेल्या उपक्रमांवरही श्री. ढगे यांनी प्रकाश टाकला. विचार आणि स्नेहाचे आदान-प्रदान अधिक वृध्दिंगत होण्यासाठी बृहन्महाराष्ट्र आणि महाराष्ट्र यामध्ये दुवा सांधणारी  एक चळवळ राज्यात निर्माण होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बृहन्महाराष्ट्रात साहित्य निर्मिती प्रमाणेच अनुवादाचेही काम होत असे. मात्र, मराठी भाषेत होणारी साहित्य निर्मिती ही देशातील अन्य भाषांमध्ये हव्या त्या प्रमाणात जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्या-राज्यांतील अशा सांस्कृतिक व्यवहारांना गती देण्यासाठी पुढाकार घेतला जावा अशी अपेक्षा श्री. ढगे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र परिचय केंद्र ठरले बृहन्महाराष्ट्राला जोडणारा दुवा      

गोवा आणि दिल्ली येथील  महाराष्ट्र परिचय केंद्र आपल्या राज्याचा त्या-त्या राज्यांतील लोकांना परिचय करून देण्याबरोबरच दोन राज्यांचे सांस्कृतिक आणि सामाजिक अनुबंध व संवाद सेतू सांधण्याचे कार्य करीत आहेत. या परिचय केंद्रांनी बृहन्महाराष्ट्राला जोडणाऱ्या दुव्यांप्रमाणे कामगिरी निभावली आहे. हे कार्य प्रत्येक राज्यात वाढत गेले तर महाराष्ट्राचा प्रभाव वाढण्यासाठी पूरक भूमिका साध्य केली जाईल. महाराष्ट्र मंडळ व परिचय केंद्र ही  चाकोरीत काम करणारी  नसून महाराष्ट्राची भूमिका प्रभावीपणे मांडणारी शक्तिस्थळे आहेत. त्यामुळे  यांची व्यापकता वाढवणे गरजेचे ठरेल यांना सोबत घेऊन भविष्यात काम करावे लागेल ,असे श्री. ढगे म्हणाले.

महाराष्ट्राने इतिहासात गौरवास्पद कामगिरी केली आहे व वर्तमानात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे आणि भविष्यातही या राज्याला वैचारिक नेतृत्व करण्याची संधी लाभणार आहे. या वैचारिक वारशाचा व औद्योगितकतेचा वसा पुढे नेत असताना एक प्रगल्भ विकासपूरक व पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राने बृहन्महाराष्ट्रातील ही  आपली जनसंपर्काची  साधने अधिक सशक्त करण्याची गरज आहे. भविष्यात ही साधने सशक्त झाल्यास महाराष्ट्र हे केवळ राज्यच नाही तर महाराष्ट्र हा एक विचार असेल, एक चळवळ असेल. महाराष्ट्र ही देशाला जोडणारी व्यापक अर्थाने सशक्त भूमिका असेल असा विश्वास श्री. ढगे यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!