खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी दि.26 रोजी फलटणला भाजपचे चक्का जाम आंदोलन


स्थैर्य, फलटण दि. 24 : सध्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसी वर्गाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर व तालुका भारतीय जनता पार्टी शनिवार 26 जून रोजी सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथे चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती, भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 68 व्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या फलटण शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि विविध आघाडी व मोर्चाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवानेते अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जयकुमार शिंदे म्हणाले, गतवेळच्या भाजपा सरकारने घेतलेले चांगले निर्णय या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षण याबाबत राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेत असून, आपल्या नाकर्तेपणाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे तर केंद्राने केलेल्या चांगल्या कार्याचे श्रेय मात्र राज्य सरकार स्वतःकडे घेत असल्याचे सांगून, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली दि.26 रोजी होत असलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी ओबीसी बांधवांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जयकुमार शिंदे यांनी केले.

तालुका अध्यक्ष पै. बजरंग गावडे यांनी चक्काजाम आंदोलनाची भूमिका व आंदोलन कशा पद्धतीने केले जाईल याची माहिती देऊन यापुढे भारतीय जनता पार्टी फलटण शहर व तालुक्यात आक्रमक भूमिका घेऊन, कार्य करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले.

शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी आपल्या प्रास्ताविकात माजी सरसंघचालक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याची माहिती देऊन, तालुक्यातील विविध प्रश्‍नासंदर्भात चर्चा केली.

यावेळी कामगार नेते बाळासाहेब काशीद यांनीही आपले विचार मांडले. आभार युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासो इवरे यांनी मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राजेश शिंदे, राहुल शहा, वसिमभाई मणेर, सागर अभंग, सुनिल जाधव, किरण राऊत, संतोष सावंत, शशिकांत रणवरे, सोमनाथ एजगर, सुधीर जगदाळे, नितीन जगताप, तानाजी करळे, अल्पसंख्याक अध्यक्ष रियाजभाई इनामदार, सौ.मुक्ती शहा, सौ.उषा राऊत, सौ.विजया कदम, सौ.ज्योती इंगवले, सौ.विमल भुजबळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!