अरण्यऋषी मारुती चितमपल्ली गुंफणार हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १२: अरण्यऋषी साहित्यिक मारुती चितमपल्ली हे “महाराष्ट्राच्या रानवाटा” या विषयावर उद्या १२ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य अर्थात २५ वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. या व्याख्यानमालेत आतापर्यंत विविध विषयांवर सलग २४ व्याख्यान झाली असून १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता मारुती चितमपल्ली  हे व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प गुंफणार आहेत.

मारुती चितमपल्ली यांच्या विषयी

भारतीय पक्षीतज्ज्ञ आणि वृक्ष अभ्यासक म्हणून अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची ख्याती आहे. १९५८-६० मध्ये त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले. निवृत्तीच्या वेळी (१९९०) ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक पदावर होते. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली. पक्षीतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनी वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होऊन निबंधवाचन केले.

डॉ. सलीम अली  वन्यप्राणी संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. ते राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती आणि औरंगाबादच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सभासद होते. याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदाचे काम पाहिले.

पक्षी आणि निसर्गाविषयी पस्तीस वर्षे निरक्षण करून चितमपल्ली यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.‘पक्षी जाय दिगंतरा’, ‘जंगलाचं देणं’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचं धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षिशास्त्र’ (संस्कृत-मराठी),‘घरटयापलीकडे’,’पाखरमाया’,’निसर्गवाचन’,’सुवर्णगरुड’,’आपल्या भारतातील साप’ (इंग्रजी-मराठी अनुवाद),’पक्षिकोश’, ‘आनंददायी बगळे’,’निळावंती’,’केशराचा पाऊस’ इत्यादी पुस्तके लिहीली आहेत. ‘चकवा चांदणं’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिध्द आहे.

जंगलाचं देणं  (१९८९), रानवाटा (१९९३) व रातवा (१९९४) या त्यांच्या पुस्तकांना  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांना विदर्भ साहित्य संघ पुरस्कार, सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार आणि मृण्मयी साहित्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

सोलापूर येथे भरलेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही चितमपल्ली यांनी  भूषविले आहे. 

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

सोमवार, 12 एप्रिल 2021  रोजी दुपारी 4 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल,फेसबुक आणि युट्यूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय  केंद्राचे मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुकप्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  ,फेसबुकपेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया गृप https://www.facebook.com/groups/525576297610799/ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युट्यूब चॅनेल वर पाहता येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!