पुणे – नाशिक महामार्गावर आणखी एका बिबट्याचा मृत्यू


स्थैर्य, दि.२२:  रस्ता ओलांडण्याच्या नादात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत नर जातीच्या बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे येथील उड्डाणपुलावर घडली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अशाच पद्धतीने बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या महामार्गावर आणखी किती जंगली प्राण्यांचा बळी जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथे उड्डाणपूल असून, रविवारी पहाटे बिबटय़ा महामार्ग ओलांडण्याच्या नादात असताना त्याला भरधाव वाहनाची जोरदार धडक बसल्याने तो जागीच ठार झाला आहे. आजूबाजूच्या नागरिकांना समजताच नागरिकांनी या बिबटय़ाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर काही जणांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनरक्षक सी. डी. कासार, अरुण यादव यांनी घटनास्थळी धाव घेत त्या मृत बिबटय़ाला वाहनातून चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले.

दरम्यान, यापूर्वीही डोळासणे शिवारात अशाच पद्धतीने महामार्ग ओलांडण्याच्या नादात बिबटय़ा ठार झाला होता. चंदनापुरी घाट, डोळासणे, एकलघाट आदी ठिकाणी महामार्गावर बिबटय़ांचे जीव गेले आहेत. त्यामुळे महामार्ग ओलांडण्याच्या नादात आणखीन किती बिबटय़ांना आपले जीव गमवावे लागणार आहेत, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

भक्ष्याच्या अथवा पाण्याच्या शोधात भटकंती करीत महामार्गावर येणाऱया वन्यजीवांचे बळी जाण्याच्या घटना सातत्याने तालुक्यातून समोर येऊ लागल्या आहेत. त्यातही संरक्षित असलेल्या बिबटय़ांची संख्या अधिक असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्यंतरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी संगमनेर तालुक्याच्या वनहद्दीचा दौरा केला होता. मात्र, तो दौरा हरित लवादाच्या अन्य एका आदेशापोटी माहितीची जमवाजमव करण्यासाठी होता. मात्र, त्यातही या महामार्गावर बिबटय़ांसाठी भुयारी मार्गाची घोषणा झाली होती. त्यानंतर पंधराच दिवसांत आणखी एका बिबटय़ाचा बळी गेला आहे.


Back to top button
Don`t copy text!