अण्णा संतापलेः आंदोलनाला हिंसक वळण लावणारे आतले की बाहेरचे शोध घ्यां


स्थैर्य,राळेगणसिद्धी, दि. २७ : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची घटना देशाला काळीमा फासणारी आहे. ही प्रवृत्ती देशाला घातक आहे. शेतकरी संघटनेचे नेते समाजाची जबाबदारी घेऊन काम करणारे आहेत. त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याची आपली पात्रता नाही. परंतु त्यांनी समतोल विचाराने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हजारे यांनी सकाळशी बोलताना केले.

हजारे म्हणाले, दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागणे दुर्दैवी आहे. आंदोलनात शिरून कोणी धुडगूस घातला की अन्य आंदोलकांनी हे पहावे लागेल. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेनुसार जनता ही देशाची मालक झाली आहे. सरकार कोणी राजे-महाराजे नाहीत.

लोकप्रतिनीधी व अधिकारी हे जनतेचे सेवक असून जनता हीच खरी देशाची मालक आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी सरकारी तिजोरी वा राष्ट्रीय संपत्ती ही नष्ट करणे चुकीचे आहे. पण जे काही घडले ते बरोबर नाही. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले, हजारो फासावर गेले, अनेकांनी हालअपेष्टा सहन केल्या. त्यातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याची जाणिव आपल्या ह्रदयात प्रत्येकाने बाळगली पाहिजे,असेही अण्णा म्हणाले.

चर्चेने प्रश्न सोडविले पाहिजेत…

दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबरोबर केंद्र सरकारच्या १२ बैठका झाल्या. एव्हढ्या बैठकांची गरज नव्हती. सरकारच्या मनात असेल तर दोन बैठकाही पुरेशा होत्या. चट मंगनी पट ब्याह अशा पद्धतीने सरकारने तातडीने आंदोलनच्या प्रश्नी मार्ग काढायला हवा होता. मार्ग न काढल्याने त्याचे दुष्परिणाम काय होतील याचा सरकारने गांभिर्याने विचार करायला हवा होता. मतभेद असू शकतात पण चर्चेने प्रश्न सोडविले पाहिजेत असे अण्णा हजारे म्हणाले.

अहिंसा व शांततेच्या मार्गाने सत्याग्रह हवा
मी ४० वर्षे अहिंसेच्या सत्याग्रहाचे आंदोलन केले. आत्मक्लेश आपण करायचे त्याच्या संवेदना दुस-यांना झाल्या पाहिजेत. कुठल्याही राष्ट्रिय संपत्तीचे नुकसान होणार नाही आणि कुणाही सर्वसामान्य नागरिकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हाच खरा सत्याग्रहाचा खरा मार्ग आहे. लोकपाल आंदोलना सारा देश उभा राहिला. पण एक दगडही कोणी उचलला नाही. त्याची जगभरातील देशात चर्चा झाली.

मी आधीच ताकीद देत असतो

आंदोलनाला हिंसक गालबोट लागले तर त्याच क्षणी मी आंदोलन थांबवेल, अशी ताकीद मी कार्यकर्त्यांना अगोदरच मी देत असतो.
तीन वर्षांपुर्वी शेतक-यांच्या प्रश्नी पंतप्रधान कार्यालय व कृषीमंत्र्यांनी दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही म्हणून माझे ३० जानेवारीपासून माझे आंदोलन हे अहिंसा व शांततेच्या मार्गाने असेल. त्यात अशा प्रकारे हिंसक घटना घडली तर त्याच क्षणी आपण आंदोलन थांबवू असेही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!