क्रीडा स्पर्धांच्या सहभागातून कामगारांच्या व्यक्तिमत्वाचा विकास – कामगार मंत्री सुरेश खाडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जानेवारी २०२३ । मुंबई । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्यामध्ये सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचाही समावेश आहे. क्रीडा स्पर्धातील कामगारांच्या सहभागामुळे  निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, असा विश्वास कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी कामगार मंत्री श्री. खाडे दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथून बोलत होते. कार्यक्रम स्थळी आमदार कलिदास कोळंबकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, अपर पोलीस महासंचालक डॉ रविंद्रकुमार, कल्याण आयुक्त रविराज इळवे, कॅनरा बँकेचे मुख्य महाप्रबंधक पी.संतोष, कामगार सहसचिव श्री. साठे, उपसचिव दीपक पोकळे, छाया शेट्टी, सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके, मुंबई कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक विश्वास मोरे आदी उपस्थित होते.

कामगार मंत्री श्री. खाडे पुढे म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कामगार कल्याण मंडळाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून ४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला. मागील २०२१ वर्षामध्ये महा क्रीडा कल्याण प्रबोधिनी स्थापन केली आहे. या प्रबोधिनी अंतर्गतसुद्धा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

आमदार श्री.कोळंबकर यांनी आपणही पूर्वी या मैदानावर कबड्डी खेळली असल्याचे सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अपर पोलीस महासंचालक डॉ रवींद्र कुमार यांनी स्पर्धेत खेळाडूंनी नियम पाळत स्पर्धेचा ‘टीम स्पिरीट’ साठी उपयोग करण्याचे आवाहन केले. पी संतोष यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात कल्याण आयुक्त श्री. इळवे यांनी कामगार कल्याण मंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांची माहिती दिली. या ठिकाणी धनुर्विद्या क्रीडा प्रकारासाठी शूटिंग रेंज निर्माण करीत असल्याचेही सांगितले.

कामगार कबड्डी स्पर्धा प्रभादेवी येथील हुतात्मा बाबू गेनू  गिरणी कामगार क्रीडा भवन  येथील मैदानात  आजपासून २७ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहे.

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहे.

औद्योगिक व व्यावसायिक कामगार कबड्डी स्पर्धेचे यंदा २६ वे वर्ष आहे, तर महिला खुल्या कबड्डी स्पर्धेचे २१ वे वर्ष आहे.

स्पर्धेविषयी थोडेसे

स्पर्धेसाठी ११० संघांनी नाव नोंदविले असून १५०० पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत. यात विविध कंपन्या, कारखाने, बँका, हॉस्पिटल्स आदी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पुरुष कामगार व कर्मचाऱ्यांचे ४६ संघ आहेत तर महिला खुल्या गटातून ६५ संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुरुष (शहरी), पुरुष (ग्रामीण) व महिला (खुला) अशा तीन गटांत सामने होणार आहेत.

तीनही गटातील अंतिम विजेत्या संघांना प्रत्येकी रु.५० हजार, उपविजेत्या संघांना रु.३५ हजार आणि तीनही गटातील प्रत्येकी २ उपांत्य उपविजेत्या संघांना रु. २० हजार तसेच सांघिक चषक, खेळाडूंना वैयक्तिक पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. या शिवाय सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्तम चढाई, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण (पकड) आणि प्रत्येक दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू आदी वैयक्तिक पारितोषिके खेळाडूंना दिली जातील.


Back to top button
Don`t copy text!