
स्थैर्य, दि.५: कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवसायासाठी निर्बंध घालूनही वेळेनंतर हॉटेल उघडे ठेवून व प्रवाश्याना जेवण देऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजगाव फाटा(ता.सातारा) येथील हॉटेल राजमुद्रावर बोरगाव पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली.याप्रकरणी हॉटेलचालक मिनाज कुंजकल चंद्रकुडी (रा.हॉटेल राजमुद्रा,अतीत,ता.सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार किरण निकम,सत्यम थोरात हे महामार्गावरून बोरगाव ते काशीळ पेट्रोलिंग करत असताना त्यांना माजगाव फाटा येथे जिल्हाधिकाऱ्यानी विहित केलेल्या वेळेनंतरही हॉटेल राजमुद्रा येथे ५-६ एसटी बसेस व ट्रॅव्हल्स थांबलेल्या आढळल्या.यावेळी त्यांनी आत जाऊन पाहिले असता हॉटेलमध्ये प्रवासी जेवण करत असल्याचे निदर्शनास आले.तसेच हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टसिंग राखले नसल्याचे व प्रवाश्याना पार्सल सुविधा न देता जेवणास बसू दिल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे कोव्हिडं-१९ रोगाचा प्रादुर्भाव होईल असे वर्तन केले.
पोलिसांनी हॉटेलचालक मिनाज कुंजकल चंद्रकुडी याच्याविरुद्ध भा.दं. वि.स कलम १८८,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोव्हिडं विनियमन कलम ११ व साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल करत आहेत.