सावधान! कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास तुमचे ‘सिम कार्ड’ होऊ शकते बंद; ‘संचारसाथी’च्या ASTR प्रणालीद्वारे पडताळणी सुरू


केंद्र सरकारच्या ‘संचारसाथी’ पोर्टलवरील ‘ASTR’ प्रणालीद्वारे कागदपत्रांत त्रुटी असलेल्या आणि व्हेरिफिकेशनकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांचे सिम कार्ड बंद केले जात आहेत. ग्राहकांनी अधिकृत स्टोअरला भेट द्यावी, फसव्या लिंक्सपासून सावध राहावे.

स्थैर्य, फलटण, दि. 24 एप्रिल : केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या (DoT) ‘संचारसाथी’ (Sanchar Saathi) पोर्टलअंतर्गत आता ‘ASTR’ ही नवीन आणि प्रगत एआय (AI) आधारित पडताळणी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे मोबाईल ग्राहकांच्या कागदपत्रांची कसून पडताळणी केली जात असून, कागदपत्रांत त्रुटी असणाऱ्या मोबाईल धारकांचे सिम कार्ड शासनाच्या नव्या धोरणानुसार थेट बंद (Block) केले जात आहेत.

‘या’ कारणांमुळे सिम कार्ड होत आहेत बंद:

शासकीय यंत्रणेच्या या नवीन प्रक्रियेनुसार, ज्या ग्राहकांच्या ओळखपत्रावरील आणि टेलिकॉम कंपनीकडे नोंद असलेल्या संपूर्ण नावामध्ये कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक (Spelling Mistake) असेल किंवा जन्मतारखेमध्ये तफावत (बदल) असेल, अशा ग्राहकांना कंपनीकडून व्हेरिफिकेशनसाठी मेसेज पाठवले जात आहेत. मात्र, ज्या ग्राहकांनी या ‘व्हेरिफिकेशन’ (पडताळणी) मेसेजकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, त्यांचे सिम कार्ड गव्हर्मेंट पॉलिसीनुसार आता कंपनीकडून कायमस्वरूपी बंद केले जात आहेत.

मूळ कागदपत्रांसह अधिकृत स्टोअरला भेट द्या:

तुमचे सिम कार्ड अशा कागदपत्रांच्या त्रुटींमुळे बंद झाले असेल किंवा तुम्हाला कंपनीकडून वारंवार पडताळणीचे मेसेज येत असतील, तर नागरिकांनी त्वरित आपल्या संबंधित टेलिकॉम कंपनीच्या (उदा. जिओ, एअरटेल, व्हीआय, बीएसएनएल) अधिकृत गॅलरीला किंवा स्टोअरला भेट द्यावी. जाताना स्वतःची मूळ कागदपत्रे (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.) सोबत घेऊन जावे, जेणेकरून तुमचे व्हेरिफिकेशन वेळेत पूर्ण होऊन सिम कार्ड पूर्ववत चालू राहील.

सायबर भामट्यांच्या फसव्या कॉल्स आणि लिंक्सपासून सावधान!

सध्या सुरू असलेल्या या शासकीय पडताळणी प्रक्रियेचा गैरफायदा सायबर भामटे घेण्याची दाट शक्यता आहे. ‘तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे, ते चालू ठेवण्यासाठी केवायसी (KYC) अपडेट करा’, असे सांगून तुम्हाला फसवणुकीचे कॉल्स येऊ शकतात किंवा व्हॉट्सॲप व एसएमएसवर खोट्या लिंक्स पाठवल्या जाऊ शकतात.

कोणतीही टेलिकॉम कंपनी ऑनलाईन लिंक पाठवून व्हेरिफिकेशन करत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही फसव्या कॉल्सला बळी पडू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि आपला ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नये. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!