
दुपारची वेळ. फलटण-कोळकीच्या सीमेवर असलेल्या एका चहाच्या टपरीवर बबन्या दुचाकीला दोन रिकाम्या घागरी बांधून चहा पीत थांबलाय. तेवढ्यात शिवा खांद्यावरचा टॉवेल सावरत तिथं येतो.
शिवा: काय रं बबन्या, भर दुपारचा या उन्हात रिकाम्या घागरी घेऊन कुठं चाललायस? काय पाण्याचा टँकर-बिंकर शोधतोयस का काय?
बबन्या: आरं शिवा, काय सांगू तुला! वैताग आलाय नुसता. आपल्या कोळकीत सलग चार दिवस नळाला ठणठणाट हाय गड्या. आज पाचवा दिवस उजेडलाय, पण तोटीतून नुसती हवा येतीया, पाण्याचा पत्ता न्हाय.
शिवा: व्हय की! मी ‘स्थैर्य’ला वाचलंय. आपल्या फलटण शहरात म्हणे आता एक दिवसाआड पाणी देणार हायती आणि कोळकीला तब्बल चार दिवसांचा गॅप!
बबन्या: हीच तर गोम हाय ना गड्या! आरं, फलटण आणि कोळकी म्हणजे काय वेगळी हायती का? बाहेरचा एखादा नवीन माणूस गावात आला आणि शहरातून फिरत-फिरत कोळकीत गेला, तर त्याला कळणार बी न्हाय की शहर कुठं संपलं आणि ग्रामपंचायत कुठं सुरू झाली! रस्ता तोच, दुकानांची गर्दी तीच, मग नळाचं नशीब कसं काय वेगळं?
शिवा: (हसत) आरं येड्या, माणसाला जरी बॉर्डर दिसली न्हाय, तरी नळाच्या पाईपलाईनला आणि प्रशासनाला बरोबर ग्रामपंचायतीची हद्द समगतीया बघ! शहराला नगरपालिका बघती आणि कोळकीला ग्रामपंचायत! पण हे बघ, धरणच तळ गाठायला लागलंय, पावसाचा अजून पत्ता न्हाय. तवा उरलेलं पाणी मोजून-मापूनच द्यावं लागंल ना.
बबन्या: ते मान्य हाय रं मला. पाणी वाचवायलाच पायजे, काटकसर करायलाच पायजे. पण इथं शहरातल्या लोकास्नी एक दिवसाआड का होईना पाणी मिळतंय, अन् आम्ही कोळकीतल्या लोकांनी काय पाच-पाच दिवस आंघोळीला सुट्टी द्यायची का काय?
शिवा: आरं, पाणी ही काय कुणाच्या घरची जहागिरी न्हवं. निसर्गानंच हात आखडता घेतलाय, तिथं कोळकी काय आणि फलटण काय! शहरातल्या लोकांनी बी एक दिवसाआड पाणी येतंय म्हणून माज न करता ते जपूनच वापरलं पायजे. नाहीतर पाईप लावून गाड्या धुवा आणि अंगणात सडे मारा… असं चाललं तर लवकरच समद्यांना टँकरच्या पाठीमागं पळावं लागंल.
बबन्या: खरंय भावा! आता एकच काम करावं लागंल. कोळकीच्या लोकांनी आंघोळीसाठी फलटणमध्ये राहणाऱ्या पाहुण्यांच्या नायतर दोस्ताच्या घरी जायचं, अन् तिथं गेल्यावर त्यांना बी ‘पाणी वाचवा’चा डोस पाजून यायचा!
शिवा: (खळखळून हसत) एकदम भारी आयडिया! चल, आता त्यांच्याकडं जाण्याआधी आपण टपरीवरचा चहा मारू, नाहीतर पाऊस पडला न्हाय तर उद्या चहा बनवायला बी पाणी मिळायचं न्हाय!
दोघेही हसतात आणि रिकाम्या घागरी गाडीला तशाच बांधून चहाचा आस्वाद घ्यायला लागतात. पाण्याचा प्रश्न आणि दुपारचं ऊन मात्र तसंच तापलेलं राहतं.
