
साखरवाडी परिसरात ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम तात्काळ थांबवावे, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा स्वाभिमानीने दिला आहे.
स्थैर्य, साखरवाडी, दि. २० जून : साखरवाडी व होळ परिसरात वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा संमती न घेता महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांच्या शंकांचे निरसन केल्याशिवाय ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
ग्राहकांमध्ये संभ्रम व नाराजी
साखरवाडी परिसरातील होळ गाव आणि आसपासच्या भागात सध्या महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र, यासाठी ग्राहकांना कोणतीही लेखी सूचना देण्यात आलेली नाही. पुरेशी माहिती न देता परस्पर मीटर बदलले जात असल्याने ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कायदा व सुव्यवस्थेस महावितरण जबाबदार
वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन आणि त्यांच्या शंकांचे निरसन करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष करून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरूच ठेवल्यास लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल. तसेच, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महावितरण प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असे कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले आणि दासाराम भोसले यांनी ही मागणी लावून धरली आहे.