फलटण शहरातुन जाणारा पालखी मार्ग मार्गी लावणार; लवकरच काम सुरू करणार : ना. नितीन गडकरी; खासदार रणजितसिंह यांच्या मागणीला यश


दैनिक स्थैर्य । दि. २७ जानेवारी २०२३ । फलटण । पिंपरी चिंचवड व पुणे येथे पालखी मार्गासाठी डबल डेकर ब्रिज आपण बांधत आहोत. आळंदी – पंढरपूर महामार्ग हा येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. फलटण शहरामधून जाणारा जो पालखी मार्ग आहे; तो मी पूर्ण करून देत आहे यासोबतच फलटण – दहिवडी – सांगली असणाऱ्या मार्गाची मंजूर करत आहे; येत्या सहा महिन्यात या मार्गाचे कामे सुरू होतील. मी खोटं आश्वासन देत नाही किंवा जे जमेल तेच काम मी करतो व त्यालाच हो म्हणतो, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने उंडवडी कडेपठार – बारामती – फलटण रस्ता चौपदरीकरण व काँक्रीटीकरण, शिंदेवाडी – भोर – वरंधाघाट रस्त्याचे भूमिपूजन व लोणंद ते सातारा रस्त्याचे लोकार्पण समारंभ फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील, आमदार दीपक चव्हाण, शहाजी पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले, यांच्यासह भारतीय जनता पार्टीसह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मला फलटणमध्ये येण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आज फलटणमध्ये मी दुसऱ्यांदा आलो आहे. ह्या ऐतिहासिक शहरामध्ये येऊन आपल्याला भेटायला मिळालं ते मोठं भाग्य आहे. माझ्या शेतीवाडी ही विदर्भातील धापेवडा येथील आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून धापेवडाचा उल्लेख आहे. आज जो फलटण तालुक्यातील वारकर्यांनी जे माझे स्वागत केले आहे; त्यामुळे मी नतमस्तक होवून वंदन करतो. तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरीची डिजिटल प्रत करायचे आम्ही ठरवले आहे. विठोबा, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी एक आपल्यावर प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळे संतांच्या बाबत आपल्या मनामध्ये एक वेगळे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजयांच्या मुळेच आज आम्ही आहे. राजा कसा असावा; तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखाच असावा. त्यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही फलटणची भूमी आहे. पालखी मार्गाचे काम करण्याचे श्रेय हे माझे नाही तर ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांनी हे माझ्या माध्यमातून हे काम करून घेतलं आहे. पालखी मार्ग करत असताना असा मार्ग करा की दोन टाईल्सच्या मध्ये गवत लावा; त्यामुळे वारकरी बांधवाना त्रास होणार नाही, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील रस्ते चांगले झाले त्यामुळे अमेरिका श्रीमंत झाली किंबहुना समृद्ध झाली. मुंबई ते बेंगलोर व नागपूर ते बंगलोर हे महामार्ग फलटणमधून जात आहेत. रामराजे फलटणमधून मुंबईला तुम्ही तीन तासात पोहचाल अशी ग्वाही तुम्हाला मी आज देतो. या देशामधील शेतकरी हे अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे. आता इथेनॉलचा वापर आपण करणे गरजेचे आहे. फलटणला असणाऱ्या विमानतळावरील असणाऱ्या मार्गाचे काम सुद्धा मी करून देतो फक्त त्याबाबत आवश्यक ते असणाऱ्या गोष्टी जिल्हाधिकारी यांनी मार्गी लावून द्यावेत, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फलटणमध्ये एवढी मोठी भव्य दिव्य सभा ही नितीन गडकरी साहेब यांची होत आहे. एकदा शब्द दिला की, तो पूर्ण करण्याचे काम हे नितीन गडकरी करीत असतात. नितीन गडकरी यांच्याकडे कामासाठी गेल्यावर त्याच्या फॉलोअपसाठी पुन्हा जावे लागत नाही. संबंध राज्यातील वारकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा ह्या नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांना कळली होती. पालखी महामार्ग फाईल ही पूर्वी प्रलंबित होती; त्यासाठी गडकरी साहेबांकडे गेलो होतो त्यांनी तातडीने सांगितले की खासदार ही फाईल पूर्ण होईल. फलटण शहरांमधून जो पालखी मार्ग जात आहे; त्याचे सुद्धा प्रलंबित काम आपण करावे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

ज्या विमानतळावर आपण उतरलो त्या ठिकाणीची हवाई मार्ग दुरुस्त करावा. फलटण तालुक्यातील शेरेचेवाडी व सुरवडी येथे ओव्हर ब्रिज मंजूर करावा. पालखी महामार्गामुळे अर्धा रिंग रोड झाला आहे; त्याला पूर्ण करून संपूर्ण रिंग रोड करावा, अशी मागणी आज फलटणकरांसाठी करत आहे. मी खासदार झाल्यानंतर जनतेची कामे कोणी केलं असेल तर गडकरी साहेब यांच्या मुळे झालं आहे. त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं होत; मला शांत करून त्यांनी फलटणला कार्यक्रम करण्याचा शब्द मला गडकरी साहेबांनी दिला. विकासकामांचा डोंगर उभा राहत असताना आम्हाला ह्या डोळ्यांनी बघायला मिळणार आहे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

फलटण ह्या ऐतिहासिक नगरमध्ये आपले प्रथमच आगमन झाले असेल. प्रमोद महाजन हे फलटणमध्ये येऊन गेल्याचे आठवत आहे. शहाजी बापू माझी भीती तुम्हाला वाटते हेच एकदम ओके आहे. आपण मूळ कोणत्या पक्षाचे आहोत आपण आधी अपक्ष आहोत. मग काँगेस मग मी पुढं काही सांगणार नाही. गडकरी साहेब मला ह्या कार्यक्रमाला बोलावलं आहे त्याबद्दल आभार. 95 साली गडकरी साहेब जेंव्हा मी माझे काम घेऊन गडकरी साहेबांकडे गेलो होतो; तेंव्हाच त्यांनी मला सांगितलं होत की आता माझ्याकडे फॉलोअप घेण्याची आवश्यकता नाही. आज सुद्धा दिल्लीमध्ये आपण गेलो तरी गडकरी साहेब ते काम मार्गी लावतात. फलटण तालुक्यातून जे दोन महामार्ग मंजूर करून पुढे गेले आहेत हेच महत्वाचे काम गडकरी साहेब आपण केले आहे. आमच्या घराने विकासाचे राजकारण आम्हाला शिकवलं आहे. विधानसभेत गडकरी साहेबाना प्रश्न विचारायचा असेल तेंव्हा मला पोटात गोळा येत होता. आपण आज जे पुण्यातून चार तासात मुंबईला पोहचत आहोत ते फक्त गडकरी साहेब यांच्यामुळेच शक्य झाले आहे. आज जो फलटण तालुक्यातून ग्रीन हायवे चालला आहे; ते अतिशय गरजेच्या वेळी तुम्ही करत आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींशी बैठक आपण दिल्ली, मुंबई किंवा कुठेही घ्यावी, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

दिल्ली येथे नितीन गडकरी जे काम करीत आहेत ते बघितलं की मला शरद पवार साहेबांची आठवण येते. शरद पवार साहेब जेंव्हा दिल्ली येथे मंत्री म्हणून काम करत असताना ज्या प्रकारे काम करत असतात त्याच प्रमाणे नितीन गडकरी हे काम करीत आहेत.

आज एक संपूर्ण सातारा जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला जिव्हाळा वाटावा असा कार्यक्रम फलटणमध्ये होत आहे. सातारा जिल्ह्याचे महत्व इतिहासात आहे. सातारा जिल्ह्यासोबत फलटणचे सुद्धा महत्व इतिहासात आहे. शिवाजी महाराजांचे सासर तर संभाजी महाराज यांचे आजोळ हे फलटणमध्ये आहे. देशामधील रस्त्यांचे जे मोठे काम करत आहेत; त्यांच्यामुळेच भारतमातेला मजबूत करण्याचे काम नितीन गडकरी करीत आहेत. नितीन गडकरी यांनी राज्यातील संबंध वारकऱ्यांचा मोठा प्रश्न सोडवला आहे. पालखी मार्ग करून वारकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न नितीन गडकरी यांनी सोडवला आहे. जसा राजा राजवड्याकडे जातो तसा वारकरी आता पंढरीकडे जाणार आहे. फलटण शहरामधून जो पालखी मार्ग जात आहे; त्याचा प्रश्न सुद्धा गडकरी साहेब आपण मार्गी लावावा, अशी मागणी आमदार शहाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असलेला आळंदी – पंढरपूर महामार्ग व श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग असलेला देहू – पंढरपूर महामार्ग हे पालखी महामार्ग म्हणून घोषित करून त्याचे उच्च दर्जाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. हे महामार्ग झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचा मोठा प्रश्न निकाली निघणार आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो वारकरी हे आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पायी वारी करीत असतात. या पालखी मार्गाचे काम हाती घेवून काम प्रगतीपथावर सुरू असल्याबद्दल फलटण तालुका वारकरी संघटनेच्यावतीने ना. नितीन गडकरी यांचे विशेष स्वागत करण्यात आले.

फलटण येथील विमानतळावर ना. नितीन गडकरी यांचे आगमन झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या प्राणगांपर्यंत ना. नितीन गडकरी यांचे भव्य दिव्य स्वागत करत रॅली काढण्यात आली. यामध्ये हत्ती, घोडे, झांजपथकाद्वारे ना. नितीन गडकरी यांची रॅली काढण्यात आली.

उंडवडी कडेपठार – बारामती – फलटण रस्ता चौपदरीकरण व काँक्रीटीकरण, शिंदेवाडी – भोर – वरंधाघाट रस्त्याचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

रामराजेंना बघून माजी आवली बसली; आमदार शहाजी पाटील

आज ह्या स्टेजवर बरेच बोलणार होतो परंतु स्टेजवर आलो आणि रामराजेंना बघितलं आणि मनात आलं की, हे म्हातारं इथं आलं त्यामुळं आता आपल्याला काहीच बोलता येणार नाही. त्यामुळ माझी आवली बसली, असे मत आमदार शहाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

खासदार रणजितसिंह यांच्या मेहनतीला यश : श्रीमंत रामराजे

आजच्या सभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप मेहनत घेतलेली दिसत आहे. त्यांना सुद्धा यश आले आहे. जेंव्हा भांडायचे आहे; तेंव्हा मनसोक्त भांडण करू, असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!