
दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण निर्भया पथक पेट्रोलिंग करत असताना एक वयस्कर महिला नवजात बालक घेवून पोलीस स्टेशनला येताना दिसली तिला विचारणा केली असता तिने सांगितले की दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताचे सुमारास शेळ्या चारत असताना निरा उजवा कॅनॉल फलटण वरील रावरामोशी पुलाचे कडेला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने तेथे जावून पाहिले असता तेथे उघड्यावर एका पोत्यावर कोणीतरी बाळ ठेवलेले दिसले.
त्यानंतर फलटण पोलीस ठाणेचे महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड यांचे मदतीने नवजात बालिकेची पाहणी करुन तिची उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे वैद्यकीय तपासणी करुन हॉस्पिटलमध्ये बालकाबाबत चौकशी केली. नवजात बालिकेस पुढील संरक्षण व संगोपन कामी बाल कल्याण समिती सातारा यांचे समोर हजर करून द्रोणागिरी शिक्षण संस्था / शिशुगृह म्हसवड, ता. माण येथे दाखल केले आहे. सदरबाबत फलटण पोलीस ठाणेस अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करणेत आला असुन पुढील कार्यवाही चालू आहे.
सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, हवालदार अनिता कांबळे, पोलीस हवालदार घाटगे, निर्भया पथकाचे महिला पोलीस अंमलदार संध्या वलेकर, भिसे यांनी केली असुन सदरकामी महिला समुपदेशक शालिनी क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.
सदर कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले. तसेच सदर नवजात बालकाबाबत कोणाला काही माहिती असेल त्यांनी फलटण शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.