राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


स्थैर्य, मुंबई, दि.१५: कोरोनामुळे मागील जवळपास एका वर्षापासून शाळा कॉलेज बंद होते. काही दिवसांपूर्वी 9 आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा सुरू होणार आहेत. येत्या 27 जानेवारीपासून शाळा सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शिक्षण विभागाची बैठक पार पडली, यात वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

 

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये इ.5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. त्यानुसार, येत्या 27 जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते, अशी माहिती त्यांनी दिली.

 

20 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा विचार

दरम्यान, येत्या 20 जानेवारीपासून राज्यातील महाविद्यालये 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना दिली होती. ते म्हणाले होते की, येत्या 8 ते 10 दिवसात याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, कॉलेज, वसतिगृह याबाबतचा चर्चा निर्णय घेतला जाईल. यानंतर येत्या 20 जानेवारीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील महाविद्यालय सुरु करता येतील का? काही नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरु आहे.’


Back to top button
Don`t copy text!