राज्यात 18 वयोगटापर्यंतच्या 2 कोटी मुलांची होणार आरोग्य तपासणी


 

स्थैर्य, मुंबई, दि.२२: राज्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा राज्यातील 2 कोटी पेक्षा अधिक मुलांना लाभ होणार आहे. तपासणीत मुलांमध्ये आढळणाऱ्या समस्या तसेच जन्मत असलेले व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि अपंगत्वाचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत मुलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि विकास साधण्यासाठी हे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. राज्यभरातील कोरोना संसर्गामुळे या कार्यक्रमात खंड पडला आहे. मात्र लवकरच हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी आणि त्यांच्यात आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणा-या समस्या, जन्मत असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील जवळपास 2 कोटी मुलांना होणार आहे. अंगणवाडीस्तरावर 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून 2 वेळेस होणारी आरोग्य तपासणी हा या कार्यक्रमाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या व्यतिरिक्त शासकीय आणि निमशासकीय शाळेतील 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांनाही या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. सदर आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य समस्यांवर मोफत उपचार पुरविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 2020-21 साठी एकूण 1195 पथके मंजुर करण्यात आलेली आहेत. यापैकी 1109 पथके महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागासाठी तर 55 पथके मुंबईसाठी मंजुर करण्यात आलेली आहेत. तसेच 31 पथके आदिवासी जिल्ह्यांमधील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!