‘स्वाध्याय’ उपक्रमात महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थी सहभागी


 

स्थैर्य, मुंबई, दि.२२:महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय (SWADHYAY) – स्टुडंट व्हॉट्सअॅप
बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजनेची सुरूवात ३ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आली होती.
स्वाध्याय उपक्रम सुरू झाल्यापासून ६ आठवड्यांमध्ये ११ लाख विद्यार्थी सहभागी झाले
असून साप्ताहिक सराव आणि गृह शिक्षण यास सुरुवात केली आहे. स्वाध्याय उपक्रम हा व्हॉट्सअॅपवर
उपलब्ध असल्याने त्याची व्याप्ती आणि सहजता यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ
घेऊ शकतात.

दिनांक ३ नोव्हेंबर
२०२० रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय
(SWADHYAY) – स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना उपक्रमाचे उदघाटन
मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या
हस्ते आणि मा. श्रीमती वंदना कृष्णा, अप्पर मुख्य सचिव, शालेय विभाग, महाराष्ट्र राज्य;
मा. श्री विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत
झाले. या उपक्रमाद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्सअॅप
वापरुन सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या माध्यमातून पहिली ते
दहावी पर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विझ (प्रश्नमंजुषा) घरच्या
घरी फोनवर उपलब्ध असतील आणि त्याचा उपयोग करून शिक्षक पालक आणि विद्यार्थी स्वतःस शैक्षणिक
सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळू शकेल. स्वाध्याय हा उपक्रम मुख्यतः राज्यातील विद्यार्थ्यांची
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्याचे एक साधन म्हणून वापरले जात आहे. 

स्वाध्याय उपक्रमाबद्दल
उच्च प्राथमिक शाळा, पळसोडी, जिल्हा गोंदिया
येथील पूर्वा जांभूळकर
हिने आपले मत प्रदर्शित केले आहे. ती म्हणते – सुरुवातील
शाळा बंद झाल्याने आम्हाला प्रामुख्याने युट्युबमधील घटकांवर अवलंबून राहावे लागे.
परंतु आता स्वाध्याय उपलब्ध झाल्याने मी, माझी बहीण आणि माझ्या मैत्रिणी या एकाच फोनवरून
ठाराविक वेळेत स्वाध्याय सोडवितो, आलेल्या अडचणींबद्दल दीक्षा अॅपचे व्हिडिओ पाहतो
आणि शिक्षकांना विचारतो. स्वाध्यायामुळे अभ्यासात मजा येते आणि नवीन शिकण्यास मिळते.

श्री
आनंद पळसे, गटशिक्षणाधिकारी, सातारा
यांनी आपला अनुभव
नमूद करताना सांगितले की, ‘कोरोना विषाणूंमुळे अचानक करण्यात आलेले लॉकडाउन आणि त्यामुळे
बंद झालेल्या शाळा यामुळे एक संकट निर्माण झाले होते. पण शासनाच्या शाळा बंद पण शिक्षण
आहे उपक्रमातंर्गत शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये ऑफलाईन
आणि ऑनलाईन अशा दोन्हींचा समावेश होता. त्यामुळे शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांचे
शिक्षण मात्र चालू राहिले. या लॉकडाउन च्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण जात होते
पण विद्यार्थी किती आणि कसे शिकत आहेत हे जाणून घेण्यास मर्यादा होत्या. स्वाध्यायामुळे
ती अडचण दूर होण्यास मदत झाली आणि विद्यार्थी किती शिकले आणि कुठे त्यांना सहकार्याची
आवश्यकता आहे हे आता शिक्षकांना कळेल.’

सामाजिक
कार्यकर्ते श्री. पिंटू चव्हाण, पेरले, तालुका कराड, जिल्हा सातारा,
यांनी स्वाध्यायबाबत प्रोत्साहन देणारा आपला अनुभव सांगितला, “आमच्या येथे बहुतेक लोक
अशिक्षित आहेत. ते स्मार्टफोन वापरु शकत नाहीत, ऑनलाइन क्लासमध्ये त्यांच्या मुलांना
सहभागी होण्यास अडचणी येतात. साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या महिन्यांत आम्ही आमच्या
समाजातील सुशिक्षित मुलांच्या मदतीने इतर मुलांचा अभ्यास सुरू ठेवण्यास मदत केली. तथापि,
इतकेच पुरेसे नव्हते. परंतु या स्वाध्यायमुळे विद्यार्थ्याना स्वतः विषय शिकण्याची
चिंता करण्याची गरज नाही. आता, समुदायामध्ये दररोज एक तास एक वर्ग होतो आणि जेथे विद्यार्थी
अडकतात, त्यांचे शिक्षक नेहमीच त्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध असतात.

सोबतच आता स्वाध्यायवर
एक नवीन फिचर जोडले जात आहे. आता स्वाध्यायमध्ये युडीआयएसई (UDISE) कोड जोडला जात असून
शिक्षक भविष्यात स्वतःच्या शाळेतील, वर्गातील विद्यार्थी यांची कामगिरी बघू शकतील आणि
विद्यार्थ्यांना मदत करू शकतील. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी
आणि गणिताचे विषय सुरू झाले असून इतर लवकरच उर्दू माध्यम, विज्ञान, विद्यार्थ्याचे
सामाजिक भावनिक जग याबाबतचाही घटक सुरू होणार असून विद्यार्थ्यांना स्वाध्यायाद्वारे
शैक्षणिक सहकार्यासोबतच इतर बाबतीतही सहकार्य केले जाणार आहे. स्वाध्यायामुळे आता प्रत्येक
घर आणि वस्ती शाळा झाली आहे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण ही समाजातील प्रत्येकाची सामाजिक
जबाबदारी आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!