सौरव राजू शेट्टी यांची फलटण येथे धावती भेट

नवीन शहराध्यक्ष विक्रम पवार यांचा सत्कार

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | फलटण |
स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सौरव राजू शेट्टी यांनी मंगळवारी फलटण येथे अचानक धावती भेट दिली. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नवीन फलटण शहराध्यक्ष विक्रम पवार यांचा सत्कार केला.

या भेटीत नुकतीच फलटण शहराध्यक्षपदी निवड झालेल्या विक्रम पवार यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. सौरव शेट्टी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि शहरातील विद्यार्थी व शेतकरी कुटुंबांच्या प्रश्नांसाठी अधिक आक्रमकपणे काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी पुणे येथे होणार्‍या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या अनुषंगाने सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. शिक्षणातील समस्या, शेतकरी मुलांचे प्रश्न, स्पर्धा परीक्षा आणि संघटनेच्या आगामी आंदोलनांवर चर्चा करण्यात आली. याबाबत सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

यावेळी धनंजय महामुलकर (सातारा जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना), नितीन यादव (फलटण तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना) तसेच स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सौरव शेट्टी यांनी सांगितले की, राज्य कार्यकारिणीत फलटण तालुक्यातील विद्यार्थी आणि शेतकरी प्रश्न प्राधान्याने मांडले जातील.

या भेटीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या फलटण शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

Back to top button
Don`t copy text!