शेती विभागात महाराष्ट्रीय बेंदूर सण उत्साहात साजरा; मान्यवरांच्या हस्ते बैलपूजन

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या शेती विभागामार्फत पारंपरिक महाराष्ट्रीय बेंदूर सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. भारतीय कृषी संस्कृतीत बैलांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत या कार्यक्रमात बैलांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बैलांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी कृषी संस्कृतीतील बैलांचे महत्त्व सांगताना, आधुनिक यांत्रिकीकरणाच्या युगातही शेतीच्या विकासात पशुधनाचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. शेतकरी आणि पशुधन यांचे नाते अधिक दृढ व्हावे तसेच कृषी परंपरा पुढील पिढीपर्यंत जपल्या जाव्यात, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. शरदराव रणवरे, व्हाईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती, श्री. भोजराज नाईक निंबाळकर, सदस्य, फलटण एज्युकेशन कौन्सिल, श्री. शिवाजीराव घोरपडे, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्री. आर. एच. पवार, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्री. रणजीत निंबाळकर, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्री. सी. डी. पाटील, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्री. रामदास कदम, सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. अरविंद निकम, प्रशासकीय अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण, डॉ. यु. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, फलटण तसेच श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक, शेती विभाग उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या बैलांचे पूजन, औक्षण, हार अर्पण व नैवेद्य खाऊ घालण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी बैलांना चारा व गूळ भरवून त्यांच्या सेवेला अभिवादन केले.

याप्रसंगी शेती विभागातील कर्मचार्‍यांनी व विद्यार्थ्यांनी बेंदूर सणाचे सांस्कृतिक, धार्मिक आणि कृषी दृष्टिकोनातून असलेले महत्त्व उपस्थितांना सांगितले.

यावेळी मान्यवरांनी भारतीय कृषी परंपरेचे जतन, पशुसंवर्धनाचे महत्त्व आणि शेतीतील शाश्वत विकासासाठी पशुधन संवर्धनाची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना पारंपरिक कृषी संस्कृती आणि सण-उत्सवांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास शेती विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वातावरणात आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे बेंदूर सणाचा हा कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

Back to top button
Don`t copy text!