कराड दक्षिणमधील ५६ हजारांहून अधिक संशयित दुबार मतदार नोंदींची सखोल चौकशी करा : पृथ्वीराज चव्हाण

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | सातारा |
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार, स्थलांतरित व संशयित मतदार नोंदी असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत माजी मुख्यमंत्री तथा २०२४ विधानसभा निवडणुकीतील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे विशेष तपासणी करून नियमबाह्य नोंदी वगळण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भातील निवेदन सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नामदेवराव पाटील यांनी निवेदनातील मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली.

नामदेवराव पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वीही पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात दुबार मतदारांची माहिती निवडणूक प्रशासनाकडे सादर केली होती. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने हा प्रश्न अद्याप कायम आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या संगणकीय विश्लेषणानुसार कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २१,१३२ मतदारांची नावे तब्बल ४८,७४१ वेळा नोंद झालेली आढळून आली असून, त्यामुळे सुमारे २७,६०९ दुबार नोंदी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय कराड दक्षिणला लागून असलेल्या कराड उत्तर, इस्लामपूर, शिराळा, पाटण आणि पलूस-कडेगाव या पाच विधानसभा मतदारसंघांतील २८,५०९ मतदारांची नावे कराड दक्षिण मतदार यादीतही नोंद झाल्याचा संशय असून, या सर्वांची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एकूण ५६,११८ संशयित दुबार अथवा स्थलांतरित नोंदींची सविस्तर यादी मतदाराचे नाव, मतदान केंद्र, भाग क्रमांक व अनुक्रमांकासह पेन ड्राइव्हद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यात सध्या डशिलळरश्र खपींशपीर्ळींश ठर्शींळीळेप (डखठ) प्रक्रिया सुरू असल्याने हीच योग्य वेळ असून कराड दक्षिण मतदारसंघातील सर्व दुबार, स्थलांतरित व संशयित नोंदींची सखोल पडताळणी करून नियमबाह्य व अपात्र नावे नव्या मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच, यापूर्वी २८ ऑगस्ट, ९ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनांवर निवडणूक प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, याची सविस्तर माहितीही उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि त्रुटीरहितपणा हा मुक्त, निष्पक्ष व विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा मूलभूत आधार असून, या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे नामदेवराव पाटील यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!