नवजाला विक्रमी ३९४ मिलीमीटर पाऊस; कोयनेत ८० टीएमसी पाणीसाठा

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | सातारा |
सातारा जिल्हयाच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असून पाटणमधील नवजा येथे मंगळवारी विक्रमी ३९४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना, महाबळेश्वर भागातही दमदार पाऊस झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ८० टीएमसीवर गेला आहे. बुधवारपासून कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून विसर्ग सुरु करण्यात येणार आहे.

सततच्या पावसामुळे मेढा-महाबळेश्वरला जोडणार्‍या केळघर घाटात सोमवारी दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरड हटविण्याचे काम मंगळवारी दुपारपर्यंत झाले नव्हते. वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.

कण्हेरनंतर उरमोडी धरणातून विसर्ग

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठे प्रकल्प आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरणात ७९ टक्के म्हणजे ११७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर सध्या पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बलकवडी धरणातून ९६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कण्हेरमधून ३ हजार ६५७, उरमोडी १ हजार आणि तारळीतून २०५ क्युसेक तिसर्ग सुरू आहे. तसेच बुधवारपासून कोयना धरणातून विसर्ग केला जाणार आहे.

मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ७६ तर नवजाला ३९४ गिलिगीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात २५ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीसाठा ८० टीएमसीवर गेला आहे. बुधवारी सकाळपासून पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!