
नीरा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून वीर धरण १०० टक्के भरले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २९ जुलै : फलटण तालुक्याला पिण्याचे व शेतीचे पाणी पुरवणाऱ्या नीरा आणि कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी सुरूच असल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. वीर धरण १०० टक्के भरले असून नीरा नदीपात्रासह कालव्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती
जलसंपदा विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, वीर धरण ९.४१ टीएमसी उपयुक्त क्षमतेसह १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात ४,६३७ क्युसेक, डाव्या कालव्यात ३०० क्युसेक आणि उजव्या कालव्यात ८०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
इतर प्रमुख धरणांमध्येही मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. भाटघर धरणात २०.८३ टीएमसी म्हणजेच ८६.९२ टक्के पाणीसाठा जमा झाला असून २४ तासांत ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा देवघर धरणात ११.०३ टीएमसी (९४.०२ टक्के) पाणीसाठा झाला असून तेथे २१ मि.मी. पाऊस पडला आहे. गुंजवणी धरण ८६.९१ टक्के (३.१८ टीएमसी) भरले असून तेथून पॉवर हाऊसद्वारे २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
धोम बलकवडी धरणात ८७ टक्के साठा
कृष्णा खोऱ्यातील फलटणच्या दुष्काळी भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या धोम बलकवडी धरणात ३.४८ टीएमसी म्हणजेच ८७.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. २४ तासांत धरण क्षेत्रात ३१ मि.मी. पाऊस पडला असून जललक्ष्मी बोगद्याद्वारे ३३० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
पाणलोट क्षेत्रात आवक सुरू असल्याने पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि कालवा परिसरातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.