‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या मुंबईमधील स्मारकासाठी मुख्यमंत्रांच्या नावे पत्र लिहून पाठबळ द्यावे : ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 05 जानेवारी 2024 | फलटण | मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे भव्य स्मारक त्यांची कर्मभूमी मुंबईमध्ये महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिका यांनी लवकरात लवकर उभारावे व त्यासाठी राज्यातील पत्रकार संघटना, वर्तमानपत्राचे संपादक, पत्रकार, वाचक यांनी मुख्यमंत्रांच्या नावे पत्र लिहून या मागणीस पाठबळ द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष व आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे स्मारक व स्मरण कार्यातील प्रमुख ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी पत्रकार दिनानिमित्त केले आहे.

बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ ही नियतकालिके सुरू करून मराठी पत्रकारितेसाठी शुभारंभाचे ऐतिहासिक योगदान दिले; एव्हढेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य नसून त्यांनी तत्कालीन बाँबे एज्युकेशन सोसायटी मधून आधी विद्यार्थी, उपसचिव, सचिव, अध्यापक, एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले भारतीय प्रोफेसर, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक, शिक्षक प्रशिक्षक अध्यापक विद्यालयाचे संस्थापक संचालक, मराठी इंग्रजीसह १४ भाषांतील प्राविण्य, १७ विविध ग्रंथांचे लेखक व संपादक, गरीब विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील पहिल्या वसतिगृहाचे संस्थापक, पहिले मराठी ग्रंथालय बाँबे नेटिव्ह लायब्ररीचे संस्थापक, मुंबई जिओग्राफिकल सोसायटीचे पहिले भारतीय कारभारी , मराठीतले पहिले ग्रंथ समीक्षक, पहिले मराठी निबंधकार, पहिले हिंदू धर्म चिकित्सक व शुद्धीकरण चळवळीचे प्रमुख समाज प्रबोधनकार, ‘ज्ञानेश्वरी’ या मौलीक ग्रंथाचे (सन १८४५) पहिले मुद्रक, प्रकाशक, बॉम्बे नेटिव्ह इंप्रोव्हमेंट सोसायटीचे (भारतीय तरुणांसाठीचे चर्चासत्र व्यासपीठ) संस्थापक, आधुनिक महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक अशा विविध कार्य कर्तृत्वातून त्यांनी मुंबईतून ऐतिहासिक योगदान दिले आहे. म्हणूनच समाजसुधारणेच्या सर्व क्षेत्रातील पहिल्या पाऊलखुणा तत्कालीन कठीण परिस्थितीतसुद्धा ज्यांनी मुंबईत उमटवल्या व हिंदुस्थानात, ब्रिटिश साम्राज्यात मुंबईचा नावलौकीक वाढविला त्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे ऐतिहासिक योगदान लक्षात घेता मुंबईत त्यांचे राष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारून त्यांची आजपर्यंतची उपेक्षा थांबवली पाहिजे, असेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!