विजयदादांनी घेतली प्रल्हादतात्यांची भेट; सदिच्छा भेटीमुळे विविध चर्चांना उधाण


दैनिक स्थैर्य | दि. 04 जानेवारी 2024 | सुरवडी | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांनी आज अचानक ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील यांची सुरवडी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याने फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध चर्चांना उधाण आलेले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विजयसिंह मोहिते – पाटील यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील व युवा नेते धैर्यशील मोहिते – पाटील यांचे फलटणदौरे वाढले आहेत. युवा नेते धैर्यशील मोहिते – पाटील तर पायाला भिंगरी लावून माढा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामध्येच ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते – पाटील यांनी सुद्धा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते – पाटील हे पुण्यावरून अकलूजला जात असताना आवर्जून फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांच्या सुरवडी येथील निवासस्थानी थांबले होते.

गतकाही दिवसांपूर्वीच निंबळक येथे उद्योजक राम निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाहीर कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते – पाटील यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर लगेच काही दिवसातच पुन्हा सुरवडी येथे सदिच्छा भेट विजयसिंह मोहिते – पाटील यांनी दिल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोहिते – पाटील कुटुंबीयांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांच्याशी संपर्क साधला असता; मोहिते – पाटील कुटुंबीयांचे व साळुंखे पाटील कुटुंब यांचे संबंध हे पूर्वीपासून आहेत. पुण्यावरून अकलूजला जात असताना विजयसिंह मोहिते – पाटील हे सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले होते; असे त्यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!