दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण आगारातून दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी ‘अष्टविनायक दर्शन यात्रा’ यासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बसमधील प्रवाशांच्या तिकिटांपोटी जमा झालेली रक्कम फलटण आगारातील सह. वाहतूक अधीक्षक यांनी त्याच दिवशी रा.प. खात्याकडे त्वरित जमा करणे आवश्यक होते; परंतु त्यांनी तसे न करता जमा झालेली रक्कम त्यांच्याकडेच ठेवली. त्यामुळे प्रवासभाड्याची रक्कम सह. वाहतूक अधीक्षक यांनी त्यांच्याकडेच ठेवल्याने त्यांच्यावर राज्य परिवहनच्या रकमेचा तात्पुरता अपहार केल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती फलटण आगारव्यवस्थापक यांनी दिली आहे.
या अपहार प्रकरणी सातारा विभागाच्या विभागीय वाहतूक अधिकारी यांनी सर्वांची चौकशी करून जाबजबाब नोंदवून सर्व अहवाल वरिष्ठ कार्यालय, मुंबई यांना सादर करण्यात आला असून त्यानुसार सह. वाहतूक अधीक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये कोणालाही वाचविण्याचा प्रयत्न केला नसून रा.प. नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असेही फलटण आगार व्यवस्थापकांनी सांगितले आहे.