मोहिते-पाटलांच्या पंगतीत काय शिजलं?


“माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे तसे मुरब्बी. राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवारांकडून उपमुख्यमंत्रीपद घेऊन भल्याभल्यांवर जरब बसवणारे नेते म्हणून विजयसिंह मोहिते-पाटलांकडे बघितले जाते. आज याच मोहिते-पाटलांनी गिरवी गाठली. कित्येक काळ राजकीय अज्ञातवासात असलेल्या दिगंबर आगवणे यांच्यासोबत मोठी पंगत आखली. यामुळे सर्वांना एकच गहन प्रश्न पडला आहे, मोहिते-पाटलांच्या पंगतीत नेमकं काय शिजलं?”
– मोहिते-पाटील, गिरवी आणि आगवणे या घडामोडीवर चैतन्य रुद्रभटे यांचे सविस्तर विश्लेषण…

माजी उपमुख्यमंत्री, माढा मतदार संघाचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वराज संघटनेचे नेते दिगंबर आगवणे यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. दिगंबर आगवणे हे गेले कित्येक महिन्यांपासून राजकीय अज्ञातवासात होते. मात्र, आज अचानक आगवणे यांच्या निवासस्थानी मोहिते-पाटील दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दिल्ली येथे असल्याचे अधिकृतरित्या सांगितले जात आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यातील सध्याचे सख्य जगजाहीर आहे. खासदार दिल्लीत असतानाच मोहिते-पाटील गिरवीत का आले असावेत? हा यक्ष प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे. आगामी काळातील निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने आत्तापासूनच तयारी सुरु केल्याचा दावा भाजपाचे कार्यकर्ते करत आहेत. पण, मोहिते-पाटील व आगवणे यांच्या आजच्या ‘पंगती’मागे निश्चितच काहीतरी शिजत असणार, अशी अटकळही बांधली जात आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. ३० मार्च रोजी फलटण-पुणे रेल्वेचा शुभारंभ होत आहे. या शुभारंभाच्या इव्हेंटसाठी भारतीय जनता पक्षाचे राज्यासह देशातील मान्यवर येणार असावेत. या इव्हेंटला येणाऱ्या नेत्यांसाठी रेडकार्पेट टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. राज्यासह देशातील मान्यवरांपुढे विधानसभेचे उमेदवार दिगंबर आगवणे यांना नेण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी गिरवी गाठली असेल, असेही मत व्यक्त केले जात आहे.

आगामी काळातील नगरपालिका, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विचारात घेतल्यास दिगंबर आगवणे हे भारतीय जनता पार्टीसाठी महत्वाचे ठरणार आहेत. आगामी काळातील निवडणुकांत जर विधानसभेच्या उमेदवारानेच प्रचार केला नाही तर पक्षाची इमेज जनसामान्यांत डॅमेज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आगवणे यांना राजकीय अज्ञातवासातून बाहेर काढण्यासाठी मोहिते-पाटील गिरवीत गेले असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फलटणचे राजकारण कुठे वळेल हे काळाच्या पोटात जरी दडले असले तरी आजच्या या भेटीने तालुक्याच्या राजकीय पटलावर गिरवीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


Back to top button
Don`t copy text!