‘शाब्बास स्वप्नील’

तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | मुंबई | ‘शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरिसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे, विश्वजित शिंदे यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संपर्क साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून नेमबाजी स्वप्नीलचे हे यश आनंददायी आहे. स्वप्नीलचा महाराष्ट्राला रास्त अभिमान आहे. नेमबाजीतील या क्रीडा प्रकारात पदक पटकावणारा स्वप्नील एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. आपण राज्यातील विविध क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू, प्रशिक्षक यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत. राज्यातील क्रीडा संकुलांच्या सुविधांचाही विस्तार करत आहोत. ऑलिंपिकहून परतल्यानंतर स्वप्नीलचे महाराष्ट्रात स्वागत आणि यथोचित सत्कार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ऑलिंपिकवीर स्वप्नील म्हणाला की, पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्येच सराव करताना नेमबाजीचा चांगला पाया घातला गेला. माझ्या यशात कुटुंबीयांसह, आईच्या मायेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक श्रीमती देशपांडे, श्री. शिंदे यांचा मोला वाटा आहे.

या संवादात मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्वप्नील कुसाळेचे आई-वडील, प्रशिक्षक, मार्गदर्शक सर्वांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!